

नागपूर: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोट्या करणे बंद करावे. ठाकरेंच्या कोट्या टोमण्याची आता जनतेला किळस आली आहे. माझी हात जोडून विनंती आहे उद्धवजी, कोट्या, टोमणे बंद करा नाहीतर तुम्हाला उरले सुरले दुकानही बंद करावे लागेल, अशी बोचरी टीका करीत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना सबुरीचा सल्ला दिला.
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार काँग्रेसने झिडकारले आहेत आणि उद्धव ठाकरे डोळे मिटून बसले असल्याची कोटी दरेकरांनी केली. तुम्ही केवळ शेतीच्या बांधावर जाऊन पुतना मावशीचे प्रेम दाखवू नका, सभागृहात या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, आता लोकांना केवळ तुमच्या कोट्या, टोमणे आवडत नाहीत याकडे लक्ष वेधले.