नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी मविआत घमासान सुरू असताना भाजपने आपल्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत पुढचे पाऊल टाकले आहे. या यादीत नागपूर शहरमधील तीन व जिल्ह्यातील सहा जागा जाहीर झाल्या असताना उर्वरित काटोल, उमरेड, सावनेर, नागपूर पश्चिम, मध्य आणि उत्तर या सहा जागांवर उमेदवार बदलाचे संकेत आहेत. या ठिकाणी नव्या चेहर्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Assembly Election)
शहरात सर्वाधिक उत्सुकता असलेल्या दक्षिण पश्चिम नागपूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामठी मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यात परंपरागत बल्लारपूर मतदारसंघातून, डॉ. पंकज भोयर वर्धा, समीर कुणावर हिंगणघाट तर रणधीर सावरकर अकोला पूर्व हे उमेदवार पुन्हा एकदा मैदानात आहेत. नागपुरातील सहा जागांपैकी पूर्व नागपूर मतदारसंघातून हॅट्ट्रिक करणारे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे तर दक्षिण नागपुरातून मोहन मते आणि हिंगणा मतदारसंघात समीर मेघे यांनाच भाजपने पुन्हा एकदा संधी दिली. शहर व जिल्ह्यातील 12 पैकी 5 उमेदवार आणि रामटेकमधून शिवसेना शिंदे गट असे सहा उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहेत. उर्वरित काटोल, उमरेड, सावनेर, नागपूर पश्चिम, मध्य आणि उत्तर या सहा जागी भाजप उमेदवार बदलून नवे चेहरे देणार असे निश्चित मानले जात आहे. (Maharashtra Assembly Election)