Vijay Wadettiwar on OBC Column in Census
नागपूर : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने ओबीसींवर अन्यायाच्या विरोधात आज (दि. १ मार्च) नागपूरच्या संविधान चौकात ओबीसी समाज एकवटत धरणे आंदोलन केले. गावोगावी असहकार आंदोलनाचा इशारा दिला. विधानसभेचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात ओबीसी समाजाच्या हक्कासाठी एल्गार पुकारण्यात आला.
देशात होणाऱ्या जनगणनेच्या अर्जात ओबीसींचा उल्लेख नसल्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होणार असून, हक्क आणि अधिकारांपासून वंचित राहावे लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या अधिकारावर गदा येणार आहे. त्यामुळे जोपर्यंत स्वतंत्र रकाना समाविष्ट होत नाही, तोपर्यंत ओबीसी संघटनांचे आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट करत स्वतःला ओबीसींचे कैवारी म्हणवणारे पंतप्रधान आणि राज्यातील मुख्यमंत्री आता का बोलत नाहीत? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
केवळ बॅनर लावून ओबीसींचे प्रश्न सुटणार नाहीत, तर त्यांना प्रत्यक्ष न्याय मिळणे गरजेचे आहे. जर सरकारने मागणी मान्य केली नाही, तर गावपातळीवर जाऊन असहकार आंदोलन केले जाईल, असा इशारा या आंदोलनात देण्यात आला.
जनगणनेच्या अर्जात ओबीसी रकाना नसल्यास ओबीसी समाज जनगणनेत सहभागी होणार नाही, अशा आशयाचे फलक घराघरासमोर लावून असहकार पुकारला जाईल, असा इशाराही या सभेत देण्यात आला.