महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे pudhari photo
नागपूर

Chandrashekhar Bawankule | काँग्रेसने स्वतःच्या नगरसेवकांचा शोध घ्यावा : चंद्रशेखर बावनकुळे

Vidhan Parishad Election | महायुती सर्व १७ जागा जिंकणार असल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

Congress Corporators Vidhan Parishad Election

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या काही नगरसेवकांबाबत सुरू असलेल्या ‘नॉट रिचेबल’ चर्चेवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. “काँग्रेसने स्वतःच्या नगरसेवकांचा शोध घ्यावा,” असा टोला लगावत महायुती सर्व १७ जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीच्या जागावाटपाबाबत ९९ टक्के एकमत झाले असून केवळ एका जागेचा प्रश्न शिल्लक असल्याची माहितीही त्यांनी दिली. काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले, याच्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचे सांगत त्यांनी काँग्रेस नेत्यांनीच आपल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा शोध घ्यावा, असे म्हटले.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष आणि नगरसेवक संपर्काबाहेर असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, नागपुरातील सुमारे ८०० मतांपैकी जवळपास ६०० मते भाजप आणि महायुतीकडे आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल आणि महायुती सर्व १७ जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला.

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार

निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकांमधील खर्च कमी करण्याचे आवाहन केले असल्याचे नमूद करत बावनकुळे म्हणाले की, प्रचार, प्रवास, वाहनांचा वापर आणि इंधन खर्च यामुळे निवडणुकांवर मोठा खर्च होतो. त्यामुळे शक्य असल्यास निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधान परिषद उमेदवारीसंदर्भात अरुण लखानी यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याबाबत विचारले असता, भाजपची यादी केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आली असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे त्यांनी सांगितले. जय पवार यांच्या नावाबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘महागाई मॅन’ म्हटल्याच्या प्रश्नावर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस हा जनतेचा विश्वास गमावलेला पक्ष असून नकारात्मकता निर्माण करून संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.

पेट्रोल-डिझेल टंचाईबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, सुरुवातीला काही पेट्रोल पंप चालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या आहेत. योग्य नियोजनामुळे पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT