नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२२) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात संजय राठोड यवतमाळ, संजय गायकवाड बुलडाणा, डॉ संजय रायमुलकर मेहकर तर अभिजीत आनंदराव अडसूळ यांना दर्यापूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. भंडारा येथून उपनेते म्हणून बढती दिलेले नरेंद्र भोंडेकर यांना तर रामटेकमधून अॅड. आशिष जैस्वाल यांची घोषणा यापूर्वीच करण्यात आली. आज अधिकृत यादीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आले.
एकंदरीत भाजपचे ९९ आणि शिवसेनेचे ४५ या प्रकारे २८८ पैकी निम्म्या जागांवर महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट एबी फॉर्मचे वाटप केले आहे. यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्याही उमेदवारांची घोषणा केली. ज्या दक्षिण नागपूरसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत दावेदारी कायम आहे, त्या ठिकाणी आदित्य दुरुगकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी दक्षिण पश्चिम मतदार संघातून तुषार गिऱ्हे यांची घोषणा झाली ते कामालाही लागले आहेत.