
पुणे, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले. 20 नोव्हेंबरला मतदान, तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदार संघात 9 कोटी 63 लाख मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वच राजकीय पक्षांजवळ केवळ महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि परिवर्तन महाशक्ती अशा तीन आघाड्या महाराष्ट्रात निवडणुका लढत आहेत. (Maharashtra Assembly Polls)
सत्तेवर असलेले भाजप, शिंदे शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी हे तीन पक्ष जसेच्या तसे विधानसभा काबीज निश्चितच करणार नाहीत. अर्थात या तीनपैकी एक किंवा दोन पक्ष निश्चितच सत्तेत असतील. विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे तीन पक्ष जसेच्या तसे सत्तेत येणार नाहीत. अर्थात या तीनपैकी एक किंवा दोन पक्ष निश्चित सत्तेत येतील.
नक्की काय होईल, ते कुणालाच कधीच सांगता येत नाही. सांगण्याचा प्रयत्न करणारे तोंडावर आपटतात. मग ते राजकीय विषयाचे पंडित असोत की न्यूज चॅनलसाठी सर्व्हे करणारे असोत. पण तरीही अंदाज करणे थांबवण्याची गरज नाही. सत्तेवर नवी धक्कादायक आघाडी येऊ शकते. (राजकारणात एवढ्या कोलांटउड्या मारल्या जातात की कसलाच धक्का बसत नाही, हा भाग वेगळा.)
अंदाज क्रमांक 1 : भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांची आघाडी.
अंदाज क्रमांक 2 : शिंदे शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस.
'आपला मुख्य शत्रू देवेंद्र फडणवीस म्हणजेच भाजप आहे', असं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जाहीरच करून टाकलंय. त्यामुळे भाजपच्या नेमक्या कोणत्या जागा कमी व्हाव्यात, यासाठी विशेष प्रयत्न होतील ? भाजप आपल्या डोक्यावर बसेल, एवढ्या भाजपच्या जागा येणं त्यांच्या युतीतल्या दोन्ही पक्षांना आवडणार नाही. दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादीच्या लक्षणीय जागा याव्यात, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पवार यांच्याकडूनही काही खास प्रयत्न होतील.
या तिघांचा निवडणूक लढवण्याचा उद्देश काहीही असो, त्याचा परिणाम एकच म्हणजे या तिन्ही घटकांचा फायदा महायुतीला आणि फटका महाविकास आघाडीला. हा योगायोग समजायचा का? बाळबोध विचार करणाऱ्यांना, बोळ्यानं दूध पिणाऱ्यांना निश्चितच तसं वाटण्याचा पूर्ण अधिकार आहे. मनसे मुख्यत: घेणार शिवसेनेची मतं. म्हणजे दोन्ही शिवसेनेची. दोन्ही शिवसेनेची मतं कमी होण्यात फायदा कुणाचा आहे? विचार करावा असा प्रश्न आहे. ज्याने त्याने आपापल्या पद्धतीनं उत्तर शोधावं.
वंचित बहुजन आघाडीनं वंचित अशा विविध जाती-धर्माच्या उमेदवारांना नेहमीच आवर्जून उमेदवारी दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित आघाडीच्या मतांची फूट झाल्याने भाजप-शिवसेनेच्या तब्बल सहा जागा वाढल्या होत्या, म्हणजेच काँग्रेसच्या पराभवाला तिथे वंचितच कारणीभूत ठरली. लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हा परिणाम कमी झाला तरी मतांची पाच ते दहा हजारांची फूटही विधानसभेत परिणामकारक ठरू शकते. वंचितने यंदाच्या निवडणुकीतील पहिल्या यादीत मुस्लिम समाजाला खूपच झुकतं माप दिल्याचं आपण वाचलंय. समझनेवालों को इशारा काफी हैं.
सर्वाधिक जागा मिळवलेला पक्ष शंभरीही गाठू शकणार नाही, असे वाटते. हे सगळं अवलंबून आहे कोण किती जागी निवडून येतं, त्यावर. मतदारराजा कुणाला किती जागा देतो, त्यावर आघाड्यांची गणितं आणखीही बदलू शकतील. जसजसा खेळ रंगेल तसतसं चित्र अधिक स्पष्ट होत जाईल. तूर्त इतकंच बास.
ताजा कलम : आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे झालेल्या चर्चेची माहिती मोठ्या आवाजात देण्यात आली.