nagpur  
नागपूर

Nagpur Election | राजकीय वातावरण तापलं!शिंदे यांच्या सभेनंतर आज उमरेडमध्ये मुख्यमंत्री काय उत्तर देणार?

Nagpur Election | नागपूर जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे.

पुढारी वृत्तसेवा

नागपूर जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीचं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. अपक्ष, महायुती आणि इतर पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरले आहेत. मागील काही दिवसांत प्रचाराचा जोर वाढला असताना मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी सभा घेतल्या. उमेदवारांच्या पाठिशी उभं राहत त्यांनी उमरेडमध्ये झालेल्या सभेत शिवसेनेच्या उमेदवाराला नगराध्यक्ष करणारच असा ठाम निर्धार व्यक्त केला.

शिंदे यांनी आपल्या भाषणात अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांची सविस्तर यादी मांडली. राज्यात राबविलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची, रस्त्यांची, महिला कल्याण योजनांची तसेच विविध विकासकामांची माहिती देत त्यांनी महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांचं मोठ्या अभिमानानं कौतुक केलं. विशेष म्हणजे, त्यांनी "लाडकी बहीण" योजना बंद होणार नाही, तर आणखी मजबूत होणार आहे, असं सांगत महिलांना दिलेल्या आश्वासनाला पुन्हा एकदा सांगीतलं.

उमरेडच्या सभेत शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, "उमरेडचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच हवा. नगर विकास खात्यामार्फत आम्ही सर्वतोपरी मदत करू. विकासासाठी पैशांची कमतरता पडू देणार नाही." या विधानानंतर शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत राजकारण अधिकच चर्चेत आलं आहे. विशेष म्हणजे, महायुती असूनही काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेनेचा प्रचार रंगताना दिसतोय. त्यामुळे उमरेडमधील निवडणूक केवळ स्थानिक पातळीवरची नव्हे, तर राज्यातील राजकीय समीकरणांची चाचणी मानली जात आहे.

आज, बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमरेड आणि वाडी येथील सभांना विशेष महत्त्व आहे. कारण शिंदे यांनी मंगळवारी केलेल्या विधानांवर फडणवीस काय प्रतिक्रिया देतात? ते भाजप उमेदवाराला कसा पाठिंबा देतात? तसेच महायुतीतील तणावाबाबत काही स्पष्ट संकेत देतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) संबंधांना निवडणुकीच्या तोंडावर नवं वळण मिळू शकतं, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

दरम्यान, अपक्ष उमेदवारांचा प्रचारही आता जोर धरत आहे. २६ नोव्हेंबर रोजी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. चिन्ह मिळाल्यानंतर हे उमेदवार थेट लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या प्रचाराचा वेग आणखी वाढेल. २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड, वाडी आणि इतर ठिकाणी या निवडणुकीची वातावरण निर्मिती प्रचंड झाली आहे. सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत घर्षण, विरोधकांचा विरोध, अपक्षांची सरशी आणि स्थानिक पातळीवरील नाराजी या सगळ्यांचा एकत्रित परिणाम निकालावर होणार, अशी चर्चा सुरू आहे.

शिंदे आणि फडणवीस यांच्या सलग सभांमुळे उमरेडची निवडणूक केवळ स्थानिक मुद्द्यांपुरती न राहता, संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेत आहे. आजच्या फडणवीस यांच्या सभेनंतर राजकीय चित्र अधिक स्पष्ट होईल, असं जाणकारांचं मत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT