Tukaram Mundhe on Savji Food  Pudhari
नागपूर

Tukaram Mundhe on Savji Food | वादानंतर हलबा समाजाचा नवा डाव; तुकाराम मुंढेंना थेट 'सावजी जेवण' चाखण्याचे निमंत्रण

मुंढेंचे स्पष्टीकरण, बावनकुळे यांची नाराजी अन् सोशल मीडियावर व्हायरल पोस्ट; सावजी खाद्यसंस्कृतीवरून पुन्हा रंगली चर्चा

पुढारी वृत्तसेवा

Savji Food Controversy

नागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेला वाद अद्यापही शमलेला नसून आता त्याला नवे वळण मिळाले आहे. मुंढे यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देत कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले, तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सार्वजनिक पदावरील अधिकाऱ्यांनी अशा विषयांवर बोलताना संयम बाळगावा, असे मत व्यक्त केले. दरम्यान, हलबा समाजातील एका उद्योजकाने मुंढे यांना सावजी जेवणासाठी निमंत्रण देणारी पोस्ट फेसबुकवर शेअर केली असून ती समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे यांनी, "मी सावजी जेवण खाल्ले तर मला एक महिना रुग्णालयात राहावे लागेल," अशा आशयाचे वक्तव्य केले होते. या विधानाचा काहींनी सावजी खाद्यसंस्कृतीचा अवमान म्हणून अर्थ काढला. त्यानंतर विदर्भातील सावजीप्रेमी, हलबा समाज तसेच विविध सामाजिक संघटनांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

वाद वाढल्यानंतर मुंढे यांनी स्पष्टीकरण देत, "मी सावजी संस्कृतीचा किंवा कोणत्याही समाजाचा अपमान केलेला नाही. मी केवळ माझ्या वैयक्तिक आहाराच्या सवयींबाबत बोललो होतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता," असे स्पष्ट केले.

या प्रकरणावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया देत सावजी ही विदर्भाच्या खाद्यसंस्कृतीची ओळख आणि अभिमान असल्याचे सांगितले. सार्वजनिक जीवनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी अशा विषयांवर भाष्य करताना अधिक संवेदनशीलता आणि संयम दाखविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, या वादाला आता सोशल मीडियावर नवे रूप मिळाले आहे. फेसबुकवर हलबा उद्योजक समाजाकडून तुकाराम मुंढे यांना सावजी जेवणासाठी निमंत्रण देणारी पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये "साहेब, तुम्ही नेहमीच बरोबर..." असा उपरोधिक उल्लेख करत "हलबा उद्योजक समाजाची तुम्हाला हाक" असा संदेश देण्यात आला आहे. तसेच "या माझ्या घरी... नागपुरी सावजी आणि सुंदर टेस्ट" असे म्हणत सावजी जेवणाचा आस्वाद घेण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

या पोस्टमध्ये सावजी खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पाटवडी, सावजी शैलीतील खाकस, गावरान शेंगा, खुर, मुंडी, सुंदरी, बोंडी, गावरान चिकन आणि मटण यांसारख्या पारंपरिक पदार्थांची छायाचित्रेही शेअर करण्यात आली आहेत. "चला, एकत्र फुल पिकनिक करूया" असे आवाहनही पोस्टच्या शेवटी करण्यात आले आहे.

ही पोस्ट हलबा उद्योजक ग्रुपचे प्रवीण सोरते यांनी फेसबुकवर शेअर केली असून "श्री. मुंढे साहेबांना सावजी समाजातर्फे निमंत्रण" असा मजकूर त्यासोबत लिहिला आहे. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर समर्थन, टीका आणि विनोदी अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

मुंढे यांचे स्पष्टीकरण, महसूलमंत्री बावनकुळे यांची प्रतिक्रिया आणि त्यानंतर समाजमाध्यमांवर सुरू झालेली निमंत्रणाची मोहीम यामुळे सावजी जेवणावरील वाद अद्याप कायम आहे. खाद्यसंस्कृती, वैयक्तिक आहाराच्या सवयी, सामाजिक भावना आणि सार्वजनिक व्यक्तींच्या वक्तव्यांची जबाबदारी या मुद्द्यांवर आता विदर्भात नव्याने चर्चा सुरू झाली असून हा विषय सामाजिक आणि राजकीय स्तरावरही चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT