

नागपूर: पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था, पूरपरिस्थितीची पाहणी, आरक्षणाचा मुद्दा आणि चालू राजकीय घडामोडींवर सरकारची भूमिका स्पष्ट केली.
अल्पवयीन अत्याचार प्रकरण व कायदा-सुव्यवस्था
अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून, दोषींवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी येत्या सोमवारी पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. भविष्यात अशा स्वरूपाच्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना या बैठकीत ठरविल्या जातील.
पूरपरिस्थिती व एनडीआरएफनुसार नुकसानभरपाई
नागपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाकडून पूर आणि पावसाने नुकसान झालेल्या सर्व भागांचा पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे. एनडीआरएफच्या (NDRF) निकषांनुसार बाधित नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या सर्व कामाचा बावनकुळे यांनी स्वतः आढावा घेतला आहे.
जात वैधता प्रकरण आणि सर्व समाजांना समान न्याय
मनोज जरांगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, जात वैधता समिती ही पूर्णपणे स्वतंत्र संस्था असून हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रातील आहे. मुख्यमंत्री, आमदार अथवा कोणत्याही राजकीय पक्षाला या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. एकूण अर्जांपैकी सुमारे ९९ टक्के प्रकरणांमध्ये वैधता प्रमाणपत्रे देण्यात आली असून, १ टक्क्यांपेक्षा कमी अर्ज नाकारले गेले आहेत. सर्व समाजांना समान निकषांवर न्याय देण्याचे काम सरकार करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार किशोर प्रशांत यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, हा संबंधित पक्षाचा अंतर्गत विषय आहे. महायुतीमध्ये घटक पक्षांमध्ये परस्पर आचारसंहिता असून, कोणत्याही मित्रपक्षाला हानी पोहोचणार नाही याची दक्षता सर्व प्रमुख नेते घेत आहेत.
लक्ष्मण हाके यांनी वापरलेली भाषा अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आणि ओबीसी समाजामध्ये समन्वय साधण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे; त्यामुळे त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन पालकमंत्री व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.