नागपूर : ओबीसीच्या हक्क, आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी श्रेयाच्या राजकीय लढाईचा इतिहास पुन्हा एकदा जनतेसमोर आणण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. भाजपने ओबीसींच्या हक्कासाठी आम्हीच सारेकाही केल्याचा दावा केला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा शरद पवारांचा नागपूर दौरा ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्मभूमीत नागपुरात पवार ९ ऑगस्टला दाखल होणार आहेत. अर्थातच यानिमित्ताने मंडल विरुद्ध कमंडल’चा मुद्दा पुन्हा रंगणार असल्याची चिन्हे आहेत. या दौऱ्यात शरद पवार ओबीसी सेलच्या मंडल यात्रेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणाऱ्या या यात्रेद्वारे, पवारांनी मुख्यमंत्री असताना देशात प्रथमच राबवलेली मंडल आयोग अंमलबजावणी जनतेच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न होणार आहे. मंडलच्या विरोधात कमंडल यात्रा काढून तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचे सरकार पाडणाऱ्यांचा, भाजपचा इतिहास लोकांना माहीत असणे गरजेचे आहे. ओबीसीचे खरे जनक कोण आणि शत्रू कोण, हे जनतेला समजायलाच हवे, यावर यानिमित्ताने युवा नेते सलील देशमुख यांनी भर दिला.
या दौऱ्यात शरद पवार विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. कवी, लेखक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार असून अखेर पत्रकार परिषदेतून आपली भूमिकाही मांडणार आहेत. एकंदरीत विरोधकांना ओबीसींच्या मुद्द्यावर सातत्याने घेरणाऱ्या भाजपला आता सडेतोड उत्तर देण्याची तयारी विरोधक करीत आहेत. यादृष्टीने शरद पवार यांचा हा विदर्भ दौरा महत्वाचा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.