

मुंबई ः राजकीय हतबलतेतून ठाकरे बंधू एकत्र, असा टोला लगावतानाच विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना मी दिलेली ऑफर हा केवळ विनोद होता, आमच्याकडे आता जागाच नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत भविष्यात कोणत्याही युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
उद्धव ठाकरेंना महायुतीत येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी त्यांना गमतीने म्हणालो होतो की, ‘तुम्हाला इकडे यायचे असेल तर विचार करू.’ तो केवळ एक विनोद होता, कोणतीही ऑफर नव्हती. माझ्या विनोदाच्या बातम्या झाल्या. मात्र, आता त्यांना ऑफर देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण, आमच्याकडे जागाच नाही. 288 सदस्यांच्या विधानसभेत आमच्यासोबत 232 सदस्य आहेत, त्यामुळे इतरांसाठी जागाच उरलेली नाही. दोन्ही ठाकरे बंधू परस्परांपासून दूर जाण्यात आणि आता पुन्हा एकत्र येण्यात आमची कसलीही भूमिका नाही. पुन्हा एकत्र येणे ही त्यांची राजकीय अगतिकता असावी, असे माझे निरीक्षण आहे. त्यांच्या डोळ्यांपुढे मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक असू शकते. मात्र, तिथेसुद्धा महायुतीच दणदणीत बहुमताने विजयी होईल, याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील सध्याची महायुती अभेद्य असून, आम्ही तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने आणि समन्वयाने पाच वर्षे काम करत आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजिबात नाराज नसून, सरकारमध्ये कोणताही बदल होणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या 20 मिनिटांच्या चर्चेबद्दल फडणवीस यांनी हसत-हसत सांगितले की, आम्ही मोकळ्या मनाने मोकळ्या खोलीत बोलत होतो. ते एका शिष्टमंडळासोबत आले होते आणि कमी संख्याबळ असूनही विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी त्यांची इच्छा होती. आम्ही चहा-कॉफी घेतली आणि चर्चा करून ते निघून गेले.
महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी आली पाहिजे, अशी सरकारची स्पष्ट भूमिका आहे. मात्र, भाषेच्या नावाने हिंसाचार होत असेल तर कारवाई केली जाईल, असा इशारा या मुलाखतीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंना दिला.