सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  file photo
नागपूर

देशमुख 'पीए'मार्फत पैसे घेत होते; वाझेचा लेटर बॉम्ब, जयंत पाटलांचेही घेतले नाव

Sachin Waze on Anil Deshmukh | वाझेच्या आरोपांमुळे राजकीय वतुर्ळात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

१०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपी आणि मुंबई पोलिसातील बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख त्यांच्या स्वीय साहाय्यक (पीए) च्या माध्यमातून पैसे घेत होते, असा दावा वाझेने केला आहे. त्याच्या या गंभीर आरोपामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

सचिन वाझे याने अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप केला. 'जे काही घडले त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. पैसे त्यांच्या (अनिल देशमुख) पीएमार्फत जात असत. सीबीआयकडे पुरावे असून मी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्रही लिहिले आहे. मी सर्व पुरावे सादर केले आहेत. मी नार्को चाचणीसाठी तयार आहे. मी लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील यांचेही नाव लिहिले आहे.' असे वाझेने म्हटले आहे.

अनिल देशमुख काय म्हणाले?

दरम्यान, देवेंद्र फडणवीस नवीन चाल करुन दहशतवादाच्या तसेच दोन खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत असलेल्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सचिन वाझे याला हाताशी धरुन माझ्यावर खोटे आरोप करीत आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी आज (दि. ३) केला.

मग देशमुखांनी वाझेला पोलीस सेवेत का घेतले? फुकेंचा सवाल

आज सचिन वाझे यांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी बडतर्फ वाझेला पुन्हा पोलीस सेवेत का घेतले, असा थेट सवाल भाजपचे आमदार परिणय फुके यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

सचिन वाझे यांची नार्को टेस्ट केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटीलच काय अनेक मोठमोठ्या नेत्यांची नावे पुढे येतील असा दावा त्यांनी यावेळी केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर राज्यातील जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर आपल्याला अनेकांनी भेटून या संदर्भात बोलण्यास सांगितले. माझ्याकडे असलेल्या माहितीनुसार अनिल देशमुख यांच्या तसेच संबंधितांच्या, नातेवाईकांच्या खात्यात कोलकत्ता येथील काही कंपन्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसा आल्याची माहिती आहे. या संदर्भात मी स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करीत असून योग्य वेळी, योग्य माहिती हाती आल्यानंतर मी या संदर्भात उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करणार असल्याचे परिणय फुके यांनी स्पष्ट केले.

फडणवीस, देशमुख एका मंचावर, पण संवाद टाळला

गेले काही दिवस अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणी आरोप- प्रत्यारोप जोरात आहेत. काल नागपुरातील विविध कार्यक्रमात फडणवीस आणि अनिल देशमुख एका मंचावर होते. मात्र या दोघांनीही प्रत्यक्ष संवाद टाळला.

Maharashtra politics : अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार

दरम्यान, आज सचिन वाझे याने अनिल देशमुख यांनी आपल्या स्वीय सहायकांच्या माध्यमातून पैसे घेतल्याचा आरोप केला. त्याने जयंत पाटील यांच्यासह अनेकांची नावे घेतली तसेच स्वतःची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. लगेच यासंदर्भात स्वतः अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला हाताशी धरून पुन्हा एकदा फडणवीस आपल्याला गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. वाझे खोटे बोलत असल्याचा फलटवार केला या पार्श्वभूमीवर आमदार परिणय फुके यांनी फडणवीस यांची पाठराखण करीत सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. एकंदरीत विधानसभा निवडणूक पूर्व महाविकास आघाडी आणि महायुतीत सध्या सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोप आणि आता नव्याने सचिन वाझेने केलेले आरोप लक्षात घेता अनिल देशमुख यांच्या अडचणी भविष्यात वाढण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT