नागपूर : नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकार्पेटिंगचे काम 31 मार्च 2025 पूर्वी करण्यात येईल तसेच उन्हाळ्यापूर्वी नियमित फ्लाईट्सही वाढणार आहेत. धावपट्टीच्या कामातील विलंबामुळे फ्लाइट ऑपरेशनवर मोठा परिणाम झाला असून विमानांची संख्या कमी झाली आहे. त्याचा विदर्भ प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेवर विशेषत: पर्यटन आणि कृषी हंगामावर विपरित परिणाम झाला आहे. उड्डाणे कमी केल्यामुळे विमान भाड्यातही वाढ झाली असून जनतेवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. नागपूर विमानतळावरील मर्यादित कामकाजाच्या तासांमुळे दर आठवड्याला सुमारे 70 उड्डाणांचे नुकसान होत असून प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही, तर आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त करीत एआयडीने या प्रकरणात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली होती.
केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीत, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजरापू राममोहन नायडू व केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही ग्वाही दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय असोसिएशन फार इंडिस्ट्रीयल डेव्हलपमेंट (एआयडी) ने या प्रकरणात लक्ष घालण्याची गडकरी यांना गळ घातली होती. दिल्ली येथे झालेल्या या बैठकीला नागरी उड्डाण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच, एआयडीचे अध्यक्ष आशीष काळे, उपाध्यक्ष गिरधारी मंत्री, कार्यकारी सचिव पंकज भोकरे आणि वरिष्ठ कार्यकारी अधिकारी विजय फडणवीस उपस्थित होते.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव वुमलुनमंग वुलनम;एम. सुरेश, अध्यक्ष (अतिरिक्त प्रभार), भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय); अनिल कुमार गुप्ता, सदस्य (नियोजन),एएआय आणि संचालक बोर्ड ऑफ मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गो हब आणि नागपूर (मिहान) विमानतळ; अबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान; आणि कुमार रंजन ठाकूर, सीएस आणि सीएफओ, मिहान इंडिया लिमिटेड; श्रीमती. स्वाती पांडे, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी), आणि संजय सेठी, अतिरिक्त मुख्य सचिव, परिवहन आणि बंदर/सामान्य प्रशासन विभाग (नागरी विमान वाहतूक), महाराष्ट्र सरकार, हे या बैठकीत ऑनलाइन सहभागी झाले.
आशिष काळे यांनी हवाई भाडे कमी व्हावे, सोयीस्कर उड्डाण वेळापत्रक असावे आणि अधिक उड्डाणे शक्य व्हावी यासाठी 31 मार्चपर्यंत धावपट्टीचा रिकार्पेटिंग प्रकल्प पूर्ण करण्याच्या निकडीवर या बैठकीत भर दिला. त्यावर नागरी उड्डयन मंत्र्यांनी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत अखंडित उन्हाळी उड्डाण वेळापत्रकाची खात्री करून, मूळ नियोजित 30 एप्रिल ऐवजी 31 मार्च 2025 पूर्वी धावपट्टीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.दरम्यान, एआयडीने सिंगापूर, बँकॉक किंवा क्वालालंपूर सारख्या दक्षिण पूर्व आशियातील हबशी थेट कनेक्टिव्हिटीची तातडीची गरज अधोरेखित केली. संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया आणि यूएसएच्या पश्चिम किनारपट्टीमध्ये विदर्भ प्रदेशाची कनेक्टिव्हीटी वाढून व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. एआयडीने दुबई, अबू धाबी आणि रियाध या मार्गांचा युरोप, आफ्रिका आणि अमेरिका यांच्याशी संपर्क वाढवण्यासाठी आणखी विस्तार करण्याची शिफारस केली.