विमानतळ जागेची पाहणी, भूसंपादन लवकरच; पुणे विमानतळाबाबत आढावा बैठक

विमानतळ जागेची पाहणी, भूसंपादन लवकरच; पुणे विमानतळाबाबत आढावा बैठक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर विमानतळाला डीजीसीए (डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन), एएआय (एअरपोर्ट अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया) यांची मान्यता मिळाली आहे. त्यासोबत एमएडीसीकडूनदेखील एनओसी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, यासंदर्भात तिघांची एकत्रिक बैठक घेऊन येथील जागेची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून लवकरच भूसंपादन प्रक्रिया होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी सांगितले.

केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे विमानतळावरील विविध प्रश्नांसंदर्भात रविवारी (दि.16) पुणे विमानतळावर आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. दरम्यान, त्यांनी या वेळी येथे उभारण्यात आलेल्या नवीन टर्मिनलचीदेखील पाहणी केली. आढावा बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके व प्रशासनातील अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होता.

मोहोळ म्हणाले, पुण्यात नव्याने उभारण्यात आलेले नवीन टर्मिनल सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येथे सुरक्षेसाठी सीआयएसएफच्या जवानांची मागणी आम्ही गृहमंत्री अमित शहा यांना केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मकता दाखवली असून, लवकरच सीआयएसएफचे मनुष्यबळ मिळणार आहे.

धावपट्टीचे विस्तारीकरण; जागामालकांना मोबदला

पुणे विमानतळावरील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत, येथील धावपट्टीचे विस्तारीकरण गरजेचे आहे. त्याकरिता राज्यमंत्री मोहोळ यांनी रविवारी आढावा बैठकीत चर्चा केली. विमानतळ परिसरातील 35 एकर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादन प्रक्रिया राज्य सरकारचा विषय असल्यामुळे येथील जागामालकांना राज्य सरकार, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीए यांच्याकडून जागेचा आर्थिक मोबदला देण्यात येणार आहे. राज्य सरकार 60 टक्के, पुणे महानगर पालिका 20 टक्के, पिंपरी-चिंचवड महापालिका 10 टक्के आणि पीएमआरडीए 10 टक्के या सूत्रानुसार येथील शेतकरी जागामालकांना 100 टक्के मोबदला दिला जाणार आहे. लवकरच ही प्रक्रियादेखील पूर्ण होणार असल्यामुळे येथील धावपट्टीचा विस्तार होणार आहे, असेही मोहोळ यांनी या वेळी सांगितले.

अपघातग्रस्त विमान हवाई दलाच्या जागेत हलवणार

एअर इंडियाचे अपघातग्रस्त विमान गेली अनेक दिवसांपासून विमान वे वर उभे आहे. त्यामुळे पुणेकर प्रवाशांच्या विमानसेवेला अडचणी येत आहेत. त्याच्या दुरुस्तीसाठी आणखी 25 दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विमान येथून हटवून संरक्षण दलाच्या जागेत ठेवण्याची परवानगी मिळावी, याकरिता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news