नागपूर : राज्यातील सर्व विद्यापीठांमधील प्राध्यापक पदभरतीच्या रखडलेल्या प्रक्रियेबाबत अखेर स्पष्टता मिळाली असून, गुणवत्तेच्या आधारे 60:40 या प्रमाणात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे माहिती, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषद सदस्य डॉ. प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
पाटील म्हणाले, राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून, या पदभरतीबाबत मागील दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रक्रिया रखडली होती. राज्यपालांच्या अधिकार व सूचनांनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, गुणवत्तेच्या निकषांवर आधारित 60:40 हे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. या सूत्रानुसार उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता, पीएच.डी., संशोधन लेख, अनुभव यावर आधारित गुणांकन करण्यात येणार आहे. तसेच मुलाखत समितीमार्फत आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून अध्यापन कौशल्याचे मूल्यमापन करण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. यापूर्वी 80:20, 50:50 अशा विविध प्रस्तावांवर चर्चा झाली होती; मात्र आता अंतिमतः 60:40 हे प्रमाण लागू करण्याचा निर्णय झाला आहे.
प्राध्यापकांच्या भरतीसाठी फाईल तयार करण्यात आली असून, नव्या निर्णयाचा सविस्तर अभ्यास करून पुढील दोन-तीन दिवसांत कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.