नागपूर

राष्ट्रपती मुर्मू दोन दिवस नागपूर दौऱ्यावर

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवस नागपूर दौऱ्यावर आल्या असून आज (दि.१) दुपारी त्यांचे नागपुरात आगमन झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. शनिवार २ डिसेंबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती मुर्मू यांचे एअर इंडियाच्या विमानाने आगमन झाल्यानंतर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एअरमार्शल विवेक गर्क, ब्रिगेडिअर राहुल दत्त, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आदींनी त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रपतींची मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली राजभवनात भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजभवन येथे आज (दि.१) भेट घेतली. यावेळी राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मेडिकल अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, नियोजित वेळेपर्यंत ते न आल्याने राजशिष्टाचार लक्षात घेता ते कार्यक्रमात नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. गंगाधरराव फडणवीस मेमोरियल हॉस्पिटल भूमिपूजन कार्यक्रमात तसेच खासदार सांस्कृतिक महोत्सवात ते हजर राहणार आहेत.

नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या ( मेडिकल ) अमृत महोत्सवी सोहळ्यावरून परत आल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू राजभवनात पोहचल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री नागपूर येथे आल्यानंतर विमानतळावरून थेट राजभावनात पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आमदार ऍड आशिष जायस्वाल उपस्थित होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT