नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आम्हाला दिलेला शब्द राज्य सरकारने पाळला, ओबीसी समाजाला कोणताही धोका या निर्णयामुळे नाही. यामुळे आम्हाला आधी दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबईत जाण्याची गरज नाही, अशी भूमिका ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केली. मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.
मराठा आरक्षण संदर्भात तिढा सुटला याबद्दल सरकारचे आभार. आंदोलकांना वाटत असेल की, सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांना समाधान वाटत असेल. त्यांचं आणि सरकारनं मार्ग काढला म्हणून सरकारच मी अभिनंदन करतो. ओबीसी आरक्षणाला कोणताही यात धक्का नाही, अशी भूमिका तायवाडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ज्या सगेसोयऱ्यांच्या व्याख्येबद्दल बोलले जात होते, यासंदर्भात आम्ही आधीही सांगितले की, वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्या महसुली व शैक्षणिक कागदपत्रावर जी जात लिहिली असेल, ती त्यांच्या मुलांना व नातवंडांना लागू होते. तेच सरकारने दिलेल्या राजपत्रात लागू होते. त्यामुळे सरकारने यात नवीन काही दिलेले नाही साहजिकच ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागला नाही. आता मराठा समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल की, आपल्याला काय मिळालं, असेही तायवाडे म्हणाले.
हेही वाचा :