Milk cooler facility Melghat
नागपूर : दोन हजार लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कुलरची सुविधा उपलब्ध होणे ही मेळघाटमधील परिवर्तनाची नांदी आहे. यातून स्थानिक दूध उत्पादनांला नवसंजीवनी मिळेल. रोजगार निर्मिती होईल, आरोग्य व्यवस्था सुधारेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मेळघाटमधून एक लाख लिटर दूधाच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवल्याचे सांगितले.
धारणी येथे दोन हजार लिटर क्षमतेच्या बल्क मिल्क कुलरचा उद्घाटन सोहळा आणि दूध उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी एनडीडीबीचे चेअरमन डॉ. मिनेश शहा, व्यवस्थापकीय संचालक सी.पी. देवानंद, मराठ वऱ्हाड मिल्क प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्ष वर्षा चव्हाण, लवादा येथील संपूर्ण बांबू केंद्राच्या प्रमुख निरुपमा देशपांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवी कोल्हे यांची उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, ‘मदर डेअरीचा हा पुढाकार मेळघाटच्या विकासासाठी आवश्यक होता. मेळघाट हा महाराष्ट्रातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास भाग आहे. हा भाग समृद्ध होणे, याठिकाणी रोजगार उपलब्ध होणे, येथील परिस्थिती सुधारणे आवश्यक होते. त्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत.
मेळघाटमध्ये दूध उत्पादन वाढविण्याच्या संदर्भात चांगले काम होत आहे. पण त्यासोबतच मक्याचेही उत्पादन घेता येईल. नेपियर ग्रास किंवा मका लावून त्याचे फॉडर तयार करून सायलेजमध्ये ठेवले तर आपण वर्षभर हिरवा चारा देऊ शकतो. नागपुरात मदर डेअरीचा साडेपाचशे कोटींचा प्रकल्प उभा होत आहे.
याअंतर्गत विदर्भ-मराठवाडातील दूध गोळा करून आईस्क्रीम, पनीर चीज, संत्राबर्फी आदी उत्पादने तयार होतील. मध्य व दक्षिण भारतात बाजारपेठही उपलब्ध होईल. त्यामुळे मेळघाटमधून जेवढे जास्त दूध होईल तेवढे खरेदी केली जाईल आणि शेतकऱ्यांना तेवढाच जास्त नफा देखील मिळेल, असेही गडकरी म्हणाले. जास्त दूध देणाऱ्या गायी व म्हशी एम्ब्रियो ट्रान्सफरच्या माध्यमातून निर्माण करण्यात याव्या, अशी अपेक्षा व्यक्त केली.
३ ते ६ वर्ष वयोगटातील तसेच अंगणवाडीतील मुलांसाठी शिशू संजीवनी कार्यक्रमाचे देखील उद्घाटन यावेळी झाले. यामध्ये मेळघाट येथील ५० गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येईल. पुढील टप्प्यांमध्ये ३२० गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. मेळघाटमधील कुपोषणमुक्तीसाठी या उपक्रमाची मदत होईल, असेही गडकरी म्हणाले.