

नागपूर: जगात जे चांगले आहे, ते नागपुरात आले पाहिजे, असा प्रयत्न आहे. विकास करताना आम्ही कधीही भेदभाव करत नाही. नागपूरच्या जनतेचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. आतापर्यंत विकासाचा पार्ट-वन झाला, आता पार्ट-टू अनुभवण्यासाठी नागपूरकरांनी सज्ज व्हावे. महायुतीच्या उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज शुक्रवारी रात्री केले.
मनपा निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा आता सुरू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार विधानसभा मतदारसंघात सभा घेतल्या. प्रकट मुलाखतीने वातावरण निर्मिती केली. शेवटच्या दिवशी 13 जानेवारी रोजी नागपुरात त्यांचा रोड शो होणार आहे. आता नागपुरातील विकासकामांचे शिल्पकार नितीन गडकरी मैदानात उतरले आहेत. पूर्व नागपुरातील वाठोडा व शांतीनगर तसेच उत्तर नागपुरातील कळमना भागात प्रभाग ५, २१, २६, १ व २ येथील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज गडकरी यांच्या जाहीर सभा झाल्या. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, संजय भेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अॅड. धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, शारदा बारई, सीमा ढोमणे, चेतना निमजे, संतोष आंबुलकर, निशा भोयर, संजय अवचट, लक्ष्मी हत्तीठेले, अभिरुची राजगिरे, संजय चावरे, महेंद्र धनविजय, सुषमा चौधरी, प्रमिला मथरानी, विक्की कुकरेजा, डॉ. सरिता मिलींद माने, अनिकेत येरखेडे, नेहा निकोसे, पंकज यादव हे उमेदवार हजर होते.
पारडी येथे लवकरच मोठे मार्केट होणार आहे. त्यासाठी एनएचएआयकडून ५० कोटी रुपये दिले आहेत. मटण, मासोळी मार्केट उभारले जाणार आहे. भाजी मार्केट वेगळे होणार आहे. रिंग रोड आता सिमेंटचा झाला. भांडेवाडीत गरिबांसाठी चारशे खाटांचे रुग्णालय झाले. शांतीनगरच्या मैदानावर लाईट्स लावून दिले. रस्ते, वीज, पाणीच नाही तर सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य साऱ्याच क्षेत्रात मोठी कामे झाली. शांतीनगरमध्ये पाण्याची समस्या आता राहिलेली नाही. भांडेवाडीमध्ये आता कचऱ्यापासून सीएनजी तयार होणार आहे. डम्पिंग यार्डच्या जागेवर मोठ्या शिक्षण संस्था आल्या. पूर्व नागपुरात मोठा दिव्यांग पार्क उभारण्यात आला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.