Nitesh Krale Assembly Election: नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जरी काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांचा शेवटच्या क्षणी विजय झाला असला तरी या विजयात मोलाचा वाटा हा नितेश कराळे उर्फ कराळे मास्तरांचा आहे. त्यांनी या निकालानंतर प्रतिक्रिया देताना या कराळे मास्तरला हलक्यात घेणे प्रस्थापितांना महागात पडल्याचा दावा केला. तसेच त्यांनी भविष्यात विधान सभेची निवडणूक लढवण्याचा मानस देखील बोलून दाखवला. त्यांनी विद्यमान आमदार अन् मंत्री पंकज भोयर यांना खुलं आव्हान दिलं आहे.
पुढारी न्यूजला विशेष मुलाखत देताना नितेश कराळे यांनी, 'हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं. ही निवडणूक अशी झाली आहे की कराळे मास्तरला हलक्यात घेतलं. भाजप आणि काँग्रेसवाले देखील कराळे मास्तरांना हलक्यात घेत होते. म्हणूनच त्यांनी तिकीट दिलं नाही. त्यांना वाटलं की कराळे मास्तरने मागच्यवर्षी सहा साडेसहा हजार मतदान घेतलं. यावर्षी ४ ते साडेचार हजारात उलचबांगडी होईल.'
नितेश कराळे पुढे म्हणाले की, 'त्यांचे सदस्य जिथे पोहचले नाहीत तिथे मी पोहचलो. माझा चाहता वर्ग आहे तो निष्ठेने माझ्या सोबत आहे. त्यांना माहिती आहे की हा शेतकरी आंदोलनात, विद्यार्थी आंदोलनात उभा राहतो अनेक जीआर आंदोलन करून मागे घ्यायला लावतो. हा कोणत्याही नेत्याच्या गाडीपुढे आडवा येऊ शकतो. त्यामुळं लोकांनी मला मतदान केलं. ते मतदान एवढं जबरदस्त केलं की दोन राष्ट्रीय पक्षांना दुसऱ्या पसंतीच्या मतासाठी गुडघ्यावर यावं लागलं. ही या विदर्भातील सहा जिल्ह्यातील जनतेची जीत आहे.
कराळे मास्तरांनी अजून एक मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, 'मी जर अभिजीत वंजारींना दोन नंबरची मते द्या असं सांगितलं नसतं तर अभिजीत वंजारी देखील निवडून आले नसते. भाजपचे कोहळे निवडून आले असते. बीजेपीने देखील दोन नंबरची मते मागितली नाहीत. त्यांची ही चुकी आहे. तुम्ही जे पेराल ते उगवलं.'
यानंतर कराळेंना पुढं काय करणार असं विचारलं असता त्यांनी आगामी विधानसभेचा शड्डू ठोकला. ते म्हणाले, 'मी आता बूथ लेवलवर काम करून विधान सभा लढवणार आहे. या पोट्ट्याने ठरवलं आहे आता पंकज भोयर यांच्या उरावर बसायचं. पंकज भोयर हे प्रभारी होते इथं ही त्यांची हार आहे त्यांचे मंत्रीपद देखील जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी आज मिटिंग घेतली अन् चांगलंच झापंल म्हणे अशी खबर माझ्यापर्यंत आली आहे. भोयर प्रभारी असल्यानं इथली सीट पडणं म्हणजे त्यांच्यासाठी खूप लाजीरवाणी गोष्ट आहे.'