Nagpur News: नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक ६५ वर्षाची महिला रस्त्यावरून चालत जात असताना साचलेल्या पाण्यातून विजेचा झटका लागला. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. महानगरपालिका आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळं ही दुर्दैवी घटना घडली आहे. बुधवारी (दि. १) रात्री ही घटना घडली.
मृत अफरोजा बेगम या नागपूरच्या ताजबाग परिसरातील भाड्याच्या घरात एकट्याच रहात होत्या. त्या किराणा दुकानातून परत येत असताना रस्त्यात साचलेल्या पाण्यात विजेचा प्रवाह प्रवाहित होता. त्याचा शॉक लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या मृत्यूला महानगरपालिकेचे कंत्राटदार आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हेळसांडपणा कारणभूत असल्याचा आरोप केला जात आहे.
पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून महानगरपालिकेच्या कंत्राटदार आणि वीज कंपनीच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या कंत्राटदार, वीज कंपनी अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे.