

नरेंद्र येरावार
उमरी : वीज तारेला स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटनेत एक शेतमजूर आणि एक बैल जागीच ठार झाले. ही घटना उमरी तालुक्यातील निमटेक येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या दोन-तीन दिवसापासून समाधानकारक पाऊस झाल्याने पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यातच दोन जुलै रोज गुरुवारी निमटेक येथील शेतकरी लक्ष्मण विठ्ठल चंदापुरे यांच्या शेतात सोयाबीन पेरणीचे काम सुरू होते. पेरणी करण्यासाठी जवळपास सहा जण बैल घेऊन तिफणीद्वारे पेरणी करीत होते. शेतात असलेल्या विद्युत खांबाच्या तणावात वीज प्रवाह उतरला, त्यातच त्यांची तिफन वीज प्रवाह असलेल्या तारेला अडकली आणि पेरणीचे काम करीत असणारा शेतमजूर शेख अस्लम जलाल साब (वय : 22 वर्ष) व एक बैल जागीच ठार झाला.
तारेचा स्पर्श होताच एकदम झटका बसला आणि इतर पाच जणांनी आपला जीव वाचवण्यासाठी क्षणार्धात बाजूला पळाले म्हणून त्यांचा जीव वाचला. मात्र या दुर्दैवी घटनेत शेतमजूर आणि बैलाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हि अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. या घटनेत जबाबदार असणाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शेख आरिफ निमटेककर यांनी केली आहे.