Ulhas Narad chargesheet
नागपूर: राज्यभर गाजत असलेल्या बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक व शिक्षकेत्तर भरती घोटाळ्यातील पहिल्या गुन्ह्यात अखेर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. 380 पानांच्या या आरोप पत्रात तत्कालीन निलंबित शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह आठ जणांचा समावेश आहे.
मात्र, अद्यापही या घोटाळ्यातील अनेक महत्त्वाचे आरोपी अटकेबाहेर असल्याने, राजकीय प्रभावातून होत असलेल्या पोलीस तपासावर शिक्षण वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शालार्थ आयडी घोटाळ्यातून आतापर्यंत अनेक शिक्षण संस्था संचालक देखील गजाआड झाले. गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2012 साली थेट शिक्षक भरतीवर बंदी आल्यानंतर या बोगस शिक्षक भरतीला सुरुवात झाली. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदांना मान्यता देत बोगस शालार्थ आयडी तयार, निर्गमित करून हा मोठा घोळ केला जात होता.
या प्रकरणी भंडारा जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पराग पुडके याची बोगस कागदपत्राच्या आधारावर थेट मुख्याध्यापकपदी नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात नागपुरातील सदर पोलिसांनी 11 एप्रिल रोजी तत्कालीन उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोली येथून अटक केली तर दुसऱ्या दिवशी माध्यमिक विभागातील बनावट कागदपत्रांच्या आधारे पराग पुडके याला शिक्षकाची नियुक्ती देणारे निलेश मेश्राम, उपसंचालक कार्यालयातील संजय बोदळकर, सुरज नाईक यांनाही अटक करण्यात आली.
सुरज नाईक, महेंद्र भाऊराव म्हैसकर, राजू केवडा मेश्राम आणि संस्थाचालक चरण नारायण चेटुले अशी नावे समोर आली. पोलिसांनी या आठ आरोपीवर 380 पानी आरोप पत्र दाखल केले आहे. या सर्वांनी बनावट नियुक्त्यांसाठी, प्रस्ताव सादर करण्यासाठी लाखो रुपये संबंधित लोकांकडून घेतल्याचे उघड झाले. सोबतच शिक्षण विभागाची फसवणूक करून शिक्षकांचे वेतन सुद्धा काढले, असाही आरोप या लोकांवर आहे.
विशेष म्हणजे सदर पोलीस, सायबर पोलिस आणि एसआयटी असा तिहेरी तपास झालेल्या या घोटाळ्यात आतापर्यंत सदर पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. यामुळेच अजून सहा आरोपींवर पुरवणी आरोप पत्र दाखल केले जाईल अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.