Pavitra Portal teacher recruitment : पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीमध्ये पारदर्शकता
मुंबई : पवित्र पोर्टलमुळे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आली आहे, असा दावा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत केला. शिक्षक भरतीबाबत सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी उपस्थित केलेल्या अर्धातास चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री भुसे म्हणाले, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करताना लोकल बॉडीच्या शाळांसाठी इयत्ता पहिली ते 12 पर्यंत तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांसाठी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
यासंदर्भात स्वतंत्र मार्गदर्शक पत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र, प्रायव्हेट शाळांमधील 9 वी ते 12 वीसाठी सध्या कोणतीही वयोमर्यादा लागू नाही. पवित्र पोर्टलद्वारे आतापर्यंत झालेल्या भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला असून, 18,034 शिक्षक पदांची भरती पूर्ण झाली आहे. दुसर्या टप्प्यात 9,000 पेक्षा जास्त पदांसाठी प्रक्रिया सुरू असून, त्यातील 1,000 पेक्षा जास्त पदे विना-मुलाखतीच्या माध्यमातून भरली गेली आहेत. संस्थात्मक मुलाखतीच्या जागांसाठीही प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
भरती प्रक्रियेच्या आगामी तिसर्या टप्प्यात विधान परिषदेतील सदस्यांनी मांडलेल्या सूचना विचारात घेऊन पोर्टल आणखी सुदृढ आणि सर्वसमावेशक करणार आहे. अल्पसंख्यांक संस्थांना 80 टक्के शिक्षक भरती करता येते. यामुळे उच्चशिक्षित शिक्षकांना संधी मिळत असून, त्यांना पसंतीच्या शाळांमध्ये नोकरी मिळवता येत आहे. पेसा कायद्याअंतर्गत आरक्षणाबाबत काही जिल्ह्यांमध्ये उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर कॅबिनेट स्तरावर निर्णय घेऊन त्या-त्या भागांतील भरती आरक्षणाच्या अनुषंगाने पार पाडली जाईल, अशी माहिती भुसे यांनी दिली.
पवित्र पोर्टल ही प्रक्रिया महाराष्ट्र शिक्षण सेवा नियमांतर्गत वैधानिक अधिष्ठानासह राबवण्यात आली असून, 100 टक्के शिक्षक भरतीसाठीचा प्रस्ताव शासनाने वित्त विभागाकडे सादर केला असल्याची माहिती यावेळी मंत्री भुसे यांनी दिली.

