Maharashtra national highways
नागपूर : नागपूर, पुण्यासह राज्यात दीड लाख कोटींची रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. जवळपास ५० हजार कोटींची कामे एकट्या पुणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आली आहेत. ही सर्व कामे येत्या तीन महिन्यांत सुरू होतील. यातील ५० हजार कोटींची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि.१३) विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
गडकरी म्हणाले,‘पुणे-छत्रपती संभाजीनगर असा १६ हजार ३१८ कोटींचा नवीन एक्सप्रेसवे बांधण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा पुणे-अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर असा राहणार आहे. या मार्गाची दुरुस्ती आणि उड्डाणपूल बांधण्यासाठी २ हजार कोटी खर्च करण्यात येणार असून या व्यतिरिक्त दुसरा रस्ता शिक्रापूर येथून अहिल्यानगरच्या बाहेरून बीड जिल्यातून करण्यात येईल. यातील केवळ टोलचे काम शिल्लक आहे. या मार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर दोन तासांत आणि छत्रपती संभाजीनगरहून नागपूर अडीच ते पावणे तीन तासांत पोहचता येईल.
तळेगाव-चाकण-शिक्रापूर एलिव्हेटेड प्रकल्पांतर्गत खाली रस्ता, त्याच्यावर दोन उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो असा चार स्तरावरील ४ हजार २०७ कोटींचा प्रकल्प असणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच याचे भूमिपूजन होईल. हडपसर ते यवत हा एलिव्हेटेड स्वरूपाचा ५ हजार २६२ कोटींचा प्रकल्प होणार आहे. विस्तृत प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम सुरू आहे. कॅबिनेटची मान्यता झाली आहे. डेव्हलपमेंट ऑफ कळंबोळी हा प्रकल्प ७७० कोटींचा आहे. ही सर्व कामे एमएसआयडीसीला दिली आहेत.
याशिवाय, एनएचएआयला काही प्रकल्प देण्यात आले आहेत. नाशिक फाटा ते खेड हा मार्ग दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. याचे ९३ टक्के भूसंपादन झाले आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत नाशिक फाटा ते आळंदी फाटा हा ४ हजार ४०३ कोटींचा आणि दुसरा टप्पा आळंदी फाटा ते खेड हा ३ हजार ३९८ कोटींचा प्रकल्प आहे. जुने पुणे नाका ते सातारा चौक असा एक उड्डाणपूल होणार आहे. वेस्टर्ली बायपासून पुणे-सातारा हा जो रोड आहे, याचा नवीन डीपीआर तयार करण्यात येणार आहे. साडे सहा ते सात हजार कोटींचा हा प्रकल्प होणार आहे. त्यावर नवीन उड्डाणपूल होणार आहे.
पुणे-मुंबई-बेंगळुरू साडे पाच तासांत
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेला एक समांतर एक्सप्रेस हायवे बांधला जात आहे. अटल ब्रीजवरून जेएनपीटीकडे गेल्यावर ग्रीनफिल्ड लिंक अटल सेतू-जेनएपीटी चौक ते पुणे-शिवार जंक्शन असा पुणे-बेंगळुरू एक्सप्रेस हायवेचा १३० किलोमीटरचा टप्पा आहे. हा प्रकल्प सुमारे १५ हजार कोटींचा आहे. यातील पहिला टप्पा मंजूर केला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दीड तासात आणि पुणे-मुंबई-बेंगळुरू असे अंतर साडे पाच तासात पूर्ण होईल. नागपूर- काटोल बायपास, जाम बायपास, २ हजार कोटींचा नागपूर-भंडारा सहापदरी मार्गही मंजूर करण्यात आला आहे.
याशिवाय मराठवाड्यातील चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान २ हजार ८०० कोटींचा नवीन मार्ग तयार होईल. १,०७४ कोटींचा तळोदा ते शहादा चारपदरी मार्ग, १ हजार २४५ कोटींचा तळोदा ते यावल चारपदरी मार्ग, तळोदा ते रावेरपर्यंत १४०० कोटींचा मार्ग होणार आहे. याव्यतिरिक्त सीआरएफ आणि अॅन्युअल प्लानमध्ये ६० हजार कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यातील २० हजार कोटींची कामे प्रगतीपथावर आहेत, अशीही माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.