

नवी दिल्ली : गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम एप्रिल 2026 अखेर पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत दिले.
राज्यातील अनेक भागात रस्ते प्रकल्पांच्या संथ गतीबद्दल शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सामंत यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना गडकरी यांनी, हा प्रकल्प गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ रखडल्याची स्पष्ट कबुलीही दिली. यामागची कारणमीमांसा करताना त्यांनी, वारंवार कंत्राटदार बदल, भूसंपादनातील अडथळे आणि राज्यस्तरीय विलंब यामुळे हा प्रकल्प रखडला होता. हा प्रकल्प 2009 मध्ये सुरू झाला. परंतु 2014 मध्ये त्यांनी मंत्रिपद स्वीकारले. तोपर्यंत अनेक मूलभूत समस्या कायम होत्या, याकडे लक्ष वेधले.
एकूण प्रकल्पापैकी सुमारे 89 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित भागांचे काम एप्रिल 2026 ची अंतिम मुदत पूर्ण करण्यासाठी वेगाने सुरू आहे. प्रकल्पाच्या विलंबासाठी जबाबदार असलेल्या एजन्सींवर कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबई ते गोवा हा प्रमुख मार्ग सुरक्षित, सुलभ आणि आधुनिक असावा, जेणेकरून पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला मोठा फायदा होईल, असे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे. पुढील वर्षी हा महामार्ग प्रवाशांसाठी पूर्णपणे खुला होईल, असे आश्वासनही मंत्री गडकरी यांनी सभागृहाला दिले.
धुळे रस्ता प्रकल्प पूर्ण होण्यास 14 वर्षे विलंब
धुळे जिल्हा रस्ते प्रकल्पातील दीर्घ विलंबाचा मुद्दाही खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी उपस्थित केला. 2010 मध्ये घोषित केलेला हा प्रकल्प अपूर्ण राहिल्याची कबुलीही गडकरी यांनी दिली. 118 कि.मी.पैकी फक्त 56 कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. 2016 आणि 2021 मध्ये झालेल्या तपासणीत गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे अंतिम देयक रोखण्यात आले. तांत्रिक बदल, दीर्घ मंजुरी आणि राज्य सरकारच्या संथ प्रगतीमुळे प्रकल्पाला सातत्याने विलंब होत असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. सर्व तांत्रिक त्रुटी दूर केल्यानंतरच तो पूर्ण झाल्याचे मानले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
खा. सुप्रिया सुळे यांनी पुणे-कोल्हापूर रस्ते प्रकल्पाच्या कामातील विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली. उत्तरात नितीन गडकरी म्हणाले की, हा मार्ग राष्ट्रीय महत्त्वाचा आहे. आता प्रगती वेगाने होत आहे.