

Maharashtra Legislative Council centenary celebration
नागपूर : भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि.१३) महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विधान भवन, नागपूर येथे आयोजित ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाला हजेरी लावत संबोधित केले.
एक विद्यार्थी ते पुढे या सभागृहाचा सदस्य आणि आणि आज पुन्हा संस्मरणीय कार्यक्रमासाठी निमंत्रित म्हणून आल्यावर त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती नीलम गोऱ्हे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
"राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दर वर्षी अधिवेशनादरम्यान अनेक विद्यार्थी याठिकाणी येतात. मी १० व्या इयत्तेत असताना एक विद्यार्थी म्हणून येथे आलो होतो. आज त्याची आठवण होत आहे. विधान परिषदेचा १०० वर्षांचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास संकलित करून आजच्या पिढीसाठी, अभ्यासकांसाठी तो ग्रंथरूपाने उपलब्ध करून देण्यात येत आहे, ही अतिशय आनंदाची आणि अभिनंदनीय बाब आहे!" असे मत या वेळी गडकरी यांनी व्यक्त केले.
दरम्यान, बाहेर विधानभवन परिसरात गडकरी माध्यमांशी बोलत असताना आमदारांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने सुरू होती. स्वतः गडकरी यांनी त्यांना पाच मिनिटे थांबा, अशी विनंती केल्याचेही बघायला मिळाले.