Former ZP vice-president Chandrashekhar Chikhale finally joins BJP, shock to former Home Minister Anil Deshmukh
नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गेले 25 वर्ष निकटवर्तीय मानले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी अखेर भाजपचे कमळ हाती घेतले आहे. काँग्रेसचे नेते ,माजी मंत्री सुनील केदार यांच्या समर्थकांपाठोपाठ आता देशमुख गटाला हा मोठा धक्का मानला जातो.
चिखले यांनी महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली. त्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. गेल्यावेळी नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मेटपांजरा सर्कलमधून त्यांच्या जागी माजी मंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांना उमेदवारी दिली गेली तेव्हापासूनच चिखले हे राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेण्याच्या पवित्र्यात असल्याची चर्चा जोरात होती.
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला. चंद्रशेखर चिखले आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार आशिष देशमुख, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाध्यक्ष मनोहर कुंभारे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने या पक्ष प्रवेशाकडे बघितले जाते. दुसरीकडे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.