नागपूर : रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरातील आदिवासीबहुल भागात व पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या आसपास असलेल्या गावांमध्ये वाघ व बिबट्यांच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता प्रशासनाने ‘एआय’ आधारित अभिनव सतर्कता यंत्रणा सुरू केली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून वन्यप्राण्यांचा गावाच्या हद्दीत वावर आढळल्यास गावकऱ्यांना तत्काळ सतर्कतेचा इशारा मिळणार आहे. सध्या तीन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित झाली असून संवेदनशील ४० ठिकाणांवर ती टप्प्याटप्प्याने उभारण्यात येत आहे.
देवलापारजवळील पिपरिया हे पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशीत असलेले छोटे गाव आहे. या भागात वाघांच्या डरकाळ्या आणि हालचाली नित्याच्या झाल्या असून अनेकदा पाळीव प्राण्यांसह माणसांवरही हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूर ग्रामीण पोलिस आणि वन विभागाने मिळून ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रणाली विकसित केली आहे.
गुरुवारी रात्री या यंत्रणेकडून पिपरिया परिसरात वाघाचा वावर असल्याचा इशारा गावकऱ्यांना आणि वन विभागाला मिळाला. त्यामुळे ग्रामस्थांनी वेळेत खबरदारी घेतली. येत्या १५ एप्रिलपर्यंत पेंच वन्यजीव क्षेत्र तसेच प्रादेशिक वनक्षेत्रातील संवेदनशील ४० गावांमध्ये ही प्रणाली कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. सुरुवातीला गावच्या सरपंचांसह निवडक व्यक्तींना मोबाईलवर इशारे मिळणार असून पुढील टप्प्यात सर्वसामान्यांसाठी सायरनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मागील अडीच ते तीन वर्षांत नागपूर ग्रामीण भागात वाघ किंवा बिबट्यांच्या हल्ल्यांत १५ गावकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ‘मार्व्हल’ या संस्थेच्या माध्यमातून ‘एआय’ आधारित यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक तथा मार्व्हल संस्थेचे सीईओ हर्ष पोद्दार यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला.
पोद्दार यांनी सांगितले की, या प्रणालीमध्ये उच्च क्षमतेचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे तंत्रज्ञान ‘बायो अॅक्यूस्टिक्स’ (ध्वनी आधारित) आणि ‘बायो व्हिज्युअल’ (दृश्य आधारित) अशा दोन पद्धतींनी कार्य करते. वाघ किंवा बिबट्यांच्या हालचाली झाल्यास चितळ, सांबर, माकड किंवा मोर यांसारखे प्राणी विशिष्ट प्रकारचे इशारे देणारे आवाज काढतात. हे आवाज ओळखून एआय प्रणाली त्यांचे विश्लेषण करते आणि संबंधितांना सतर्कतेचा संदेश पाठवते. तसेच कॅमेऱ्यात प्राण्याचे प्रत्यक्ष चित्र टिपले गेल्यासही त्वरित इशारा पाठविला जातो.
वन विभागाच्या मदतीने अशा हल्ल्यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ४० ठिकाणांची निवड करण्यात आली असून तेथे कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. मागील चार दिवसांत दोनदा वाघ व बिबट्यांच्या हालचालींचे इशारे या प्रणालीने दिले असल्याचेही पोद्दार यांनी सांगितले.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही अशीच एआय आधारित सतर्कता यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव असून यासंदर्भात वन विभाग आणि मार्व्हल संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आल्याची माहितीही पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.