

नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खासगी कंपन्यांकडून शेतकऱ्यांना अनधिकृत फार्मर आयडी वाटले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा केवळ आयडी वाटपाचा विषय नसून शेतकऱ्यांची खासगी माहिती एखाद्या कंपनीकडे आहे त्याचा गैरवापर होऊ शकतो, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या काळात विधानसभेत केली.
फार्मर आयडी बाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, शेतकऱ्यांचा डेटा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर जमा होत असताना सायबर हॅकिंग किंवा डेटा चोरी टाळण्यासाठी शासनाने कोणतेही ठोस पाऊल उचललेले दिसत नाही. एखादी खासगी कंपनी कोणत्या अधिकाराने शेतकऱ्यांचे आयडी बनवत आहे? या कंपन्यांकडे शेतकऱ्यांची माहिती पोहोचली कशी? जर कृषी खात्याने असे कोणतेही अधिकार दिलेले नाहीत, तर या कंपन्या प्रिंट्स वाटून शेतकऱ्यांची दिशाभूल कशी करत आहेत.
यावर उत्तर देताना कृषिमंत्री यांनी सांगितले की, अशा पद्धतीने कोणत्याही कंपनीला आयडी देण्याचे काम दिलेले नाही. फार्मर आयडीबाबत कोणी तक्रार केली तर याची चौकशी केली जाईल, असे सभागृहात स्पष्ट करण्यात आले आहे.