

नागपूर : एकीकडे जिल्हा प्रशासनातर्फे कुठलीही टंचाई नाही असा दावा करीत असताना नागपुरात देखील व्यावसायिक आणि घरगुती गॅस मिळत नसल्याने काळाबाजार रोखण्यासाठी अन्न पुरवठा विभागाकडून आज बुधवारी वेगवेगळ्या भागात धाडसत्र सुरू झाले.
गॅस एजन्सी, गॅस गोडाऊन, हॅाटेल, धाब्यांवर हे धाडसत्र काही दिवस सुरू राहणार आहे. डोमेस्टिक गॅस एजंसी सिव्हील लाईन्समध्ये या पथकाने चौकशी केल्यानंतर एजंसीच्या जरिपटका पोलिस स्टेशन ते स्मशानभुमी रोडवरील गॅस गोडावूनवर तपासणी केली. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे चटके आता राज्यातही सर्वसामान्यांना बसत आहे.
हॉटेल, केटरर्स यांना मोठ्या प्रमाणात गॅस तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे खाद्य पदार्थाचे दर वाढले असून खवय्यांची सोय कशी करायची हा यक्ष प्रश्न हॉटेल मालक, व्यवस्थापकाना सतावत आहे. अनेकांनी लाकडे आणली असून भट्टी सुरू केली आहे.
एकीकडे नागपुरात व्यावसायिक सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा हॉटेल व्यावसायिकांनी वापर सुरू केल्याचे चित्र आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर देखील लवकर आणि ओटीपीशिवाय मिळत नसल्याने सामान्य नागरिक, महिला त्रस्त आहेत.