नागपूर

Chlorine gas leakage nagpur : गोधनी वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये क्लोरीन गॅस लीक; पहाटेच्या घटनेने परिसरात खळबळ

नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले, काहींवर रुग्णालयात उपचार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नगरपरिषद गोधनी येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये सोमवारी (२४ ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास ९०० किलो क्षमतेच्या क्लोरीन गॅस सिलेंडरमधून गळती झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. क्लोरीन वायू आजूबाजूच्या वस्तीत पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही नागरिकांना खोकला तसेच श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे १.१० वाजता वॉटर ट्रीटमेंट प्लांटमधील क्लोरीन सिलेंडरमधून गळती सुरू झाल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली. घटनेची माहिती मिळताच सुगत नगर, सिव्हिल आणि कळमना अग्निशमन केंद्रातील पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाने दोन वॉटर टेंडर तसेच ब्रीदिंग अ‍ॅपरेटर्सच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.

क्लोरीन वायूचा परिसरात फैलाव झाल्याने मानकापूर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांना सुरक्षित अंतरावर जाण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, काही नागरिकांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना झिंगाबाई टाकळी येथील स्पर्श हॉस्पिटल तसेच मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी ओसीडब्ल्यूचे कर्मचारी तसेच एनडीआरएफच्या पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पहाटे सुमारे ५.३० वाजताच्या सुमारास क्लोरीनची गळती कमी झाल्यानंतर एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि ओसीडब्ल्यू कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून क्लोरीन सिलेंडर कॉस्टिक सोडा मिश्रित पाण्याच्या टाकीत टाकण्यात आला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी डोकरे, शामकुळे आणि घवघवे यांच्यासह विविध अग्निशमन केंद्रांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी उपस्थित होते. घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते. दरम्यान, क्लोरीन गळती नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT