NCP Sharad Pawar Pudhari
नागपूर

NCP (SP) nagpur news : नागपूर जिल्हा कार्यकारणी बरखास्त; सलील देशमुखांचा मोठा निर्णय

काम न करणाऱ्यांना डच्चू, नवोदितांना संधी; प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच सलील देशमुख यांनी पक्षाच्या संघटन बांधणीसाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संघटनात्मक पुनर्रचना आणि मजबुतीकरणाचा भाग म्हणून त्यांनी पक्षाची जुनी जिल्हा कार्यकारणी तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबतची माहीती सलील देशमुख यांनी पत्राद्वारे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना दिली आहे.

जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर सलील देशमुख यांनी पक्षाच्या संघटनात्मक रचनेत आमूलाग्र बदल करण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाची पाळेमुळे तळागाळापर्यंत घट्ट करण्यासाठी ते स्वतः मैदानात उतरणार आहेत. 'फ्रंटल'च्या सर्व अध्यक्षांना सोबत घेऊन ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार असून, स्थानिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत. पक्षाची नवी कार्यकारिणी स्थापन करताना निष्ठा आणि कामगिरी हाच एकमेव निकष असणार असल्याचे सलील देशमुख यांनी स्पष्ट केले.

या संदर्भात बोलताना त्यांनी सांगीतले की: "केवळ संघटनेचे पद पदरात पाडून घ्यायचे आणि पक्षाच्या कामात काहीच योगदान द्यायचे नाही, अशा निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना आता बाजूला सारले जाईल. पक्षासाठी दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या, जनसामान्य आणि कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेल्या नवीन व होतकरू लोकांनाच नव्या कार्यकारिणीत मानाचे स्थान दिले जाईल."

येत्या काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात पक्षाला अधिक सक्षम आणि गतिशील बनवणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश मानला जात आहे. जुनी कार्यप्रणाली मोडून काढत, नव्या दमाच्या तरुणांना आणि कार्यकर्त्यांना पुढे आणण्याच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT