Nagpur News | पेंच प्रकल्पाचे पाणी तातडीने शेतकऱ्यांसाठी सोडा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankulePudhari
Published on
Updated on

नागपूर -खरीप हंगामातील पिकांना पाण्याची गरज लक्षात घेता पेंच प्रकल्पातील पाणी तातडीने शेतकऱ्यांसाठी सोडण्याचे निर्देश महसूल तथा अमरावती व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

एल-निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने पिण्याच्या पाण्याच्या नियोजनाबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. जलसंपदा विभागाने सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पाटबंधारे विकास महामंडळे, जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच नगरपरिषदांना ३१  ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. 

शासनाच्या निर्देशानुसार, धरणांतील पाणीसाठ्याचे नियोजन करताना पिण्याच्या पाण्याची गरज, बाष्पीभवनामुळे होणारी पाण्याची घट, धरणांतील गाळ यांचा विचार करून आवश्यक पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित पाण्याचा वापर सिंचन व इतर कारणांसाठी करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे

याशिवाय, जलाशयांतील पाणीसाठा, पर्जन्यमान आणि भविष्यातील संभाव्य परिस्थितीचा नियमित आढावा घेऊन पाणी वितरणाचे नियोजन वेळोवेळी पुनरावलोकन करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले. कोणत्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी विशेष दक्षता घ्यावी, असेहि त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान,शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर पाणी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असून, पाण्याअभावी कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी सोडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाणी वितरण करताना शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच सिंचन विभागाने स्थानिक लोकप्रतिनिधी व पाणी वापर संस्था यांनी शेतकरी प्रतिनिधींशी समन्वय साधून पाणी वितरणाचे नियोजन करावे, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि आवश्यक त्या ठिकाणी नियमित देखरेख ठेवावी, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news