नागपूर - अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल असताना दिवाळीपूर्वी त्यांना शासन मदत देऊ शकले नाही. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची त्वरित अंमलबजावणी करा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी भरीव मदत द्या, सध्याची जाहीर करण्यात आलेली मदत अपुरी आहे. शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजार त्वरित आर्थिक मदत द्यावी. संत्रा आणि मोसंबी बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. संत्रा/मोसंबी उत्पादकांना योग्य नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. पीक विमा योजनेचे सध्याचे निकष अत्यंत क्लिष्ट आणि शेतकरी विरोधी आहेत. अनेकदा स्थानिक नुकसान होऊनही पीक विम्याचा लाभ मिळत नाही. याची त्वरित अंमलबजावणी केली जावी अशी मागणी आंदोलकांनी केली.
आयात केलेला कापूस, व्यापाऱ्यांकडील जुना साठा आणि शेतकऱ्यांकडील नवीन कापूस असे सर्व एकाच वेळी बाजारात उपलब्ध झाल्यास कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळतात. यामुळे हमीभाव सुध्दा शेतकऱ्यांना मिळत नाही. ज्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. यामुळे आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन 11 टक्के माफ करण्यात आलेले आयात शुल्क रद्द करुन मोठया प्रमाणात कापसाची निर्यात होण्यासाठी पाठपुरावा करावा आदी मागण्यांकडे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा प्रशासनामार्फत निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले.