

नागपूर - नागपूर जिल्ह्यातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीत काम करणाऱ्या आज थकीत वेतनाच्या मागणीसाठी दिवाळीच्या तोंडावर आज काढलेला मोर्चा आणि केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर नागपूर हैदराबाद महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी बळाचा वापर करीत अनेक पुरुष, महिला कामगारांना ताब्यात घेतल्याने वातावरण तापले. जनशक्ती विदर्भ कामगार संघटनेच्यावतीने आज गुरुवारी नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव परिसरात हे भीक मांगो आंदोलन करण्यात आले. गेले दोन महिने वेतन मिळाले नाही. अनेक दिवस हे कामगार आपल्या थकीत वेतन आणि इतर मागण्यासाठी आक्रमक आहेत.
आज त्यांनी मोर्चाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी नागपुरातील त्यांच्या निवासस्थानकडे आगेकूच सुरू केली असता वर्धा मार्गावर आधीच करण्यात आलेल्या तगड्या पोलिस बंदोबस्ताने त्यांची वाट रोखली. पोलिसांनी आपले सामान, मोबाईल हिसकावले, शांततामय मार्गाने दोन दोनच्या रांगेत आम्ही मोर्चाने जात असताना पोलिसांनी बळजबरीने वातावरण चिघळवले. महामार्ग आम्ही नव्हे तर त्यानीच रोखल्याचा आरोप या संतप्त कामगारांनी केला. जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी कामगारांना व्यवस्थापनासोबत चर्चेचा पर्याय उपलब्ध करून दिला असताना कामगार आपल्या आंदोलनावर ठाम होते. बराच वेळ कामगार आपल्या मागण्यांबाबत आक्रमक पवित्र्यात होते.