Arrested  FiIle Photo
नागपूर

Nagpur Crime | नागपुरातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरणी ठाण्यातील तरुणाला अटक

दोघांची ओळख इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरून, दिघोरी परिसरात अत्याचार करून खून करण्याचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Minor Girl Kidnapping Case

नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार तसेच खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ठाण्यातील १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही माहिती नागपूर पोलीस उपायुक्त (झोन ४) रश्मिता राव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीशी ओळख निर्माण केली होती. दोघांची ओळख इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरून झाली होती. त्यानंतर आरोपीने मुलीचे अपहरण करून नागपूरच्या दिघोरी परिसरातील एका रूममध्ये नेले. ही रूम त्याने ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून बुक केली होती.

तेथे आरोपीने मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि तिचा खून करण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले असता आरोपीने मुलीच्या गळ्यावर चाकू लावला होता. मात्र, पोलिसांनी धाडसी कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आणि आरोपीला ताब्यात घेतले.

तपासात आरोपीने नागपुरातच चाकू खरेदी केल्याचे तसेच तो यापूर्वीही नागपुरात आल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित मुलीच्या मोबाईलवरील पॅरेंटल कंट्रोलही आरोपीच्या ताब्यात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी बलात्कार, अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेत आरोपीचे नाव निर्भय ऊर्फ आकाश माधव पाखरे (वय १९, रा. ठाणे) असे असल्याची माहिती देण्यात आली. तो बीबीएचा विद्यार्थी असल्याचेही सांगण्यात आले. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या आरोपीकडून यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटना घडल्या असल्याची माहिती कोणाकडे असल्यास त्यांनी पुढे येऊन पोलीसांशी संपर्क साधावा.

या प्रकरणात आरोपी हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा नातेवाईक असल्याच्या चर्चांचा तपासाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आरोपीने एखादा चित्रपट किंवा वेब सिरीजचा प्रभाव, अथवा मानसिक स्थितीमुळे हे कृत्य केले का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT