नागपूर

Nagpur news : मेयो लाचखोरी प्रकरणात डॉ. जायसवालांना दिलासा नाही; न्यायालयीन कोठडी

पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाचा आदेश; बँक खाती, लॉकर आणि मालमत्तेची एसीबीकडून चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथील गाजत असलेल्या कथित लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेले शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. नंदकिशोर कमलनारायण जायसवाल आणि त्यांचा स्टेनो यांना न्यायालयाकडून कोणताही तातडीचा दिलासा मिळालेला नाही. दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर जिल्हा न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावत नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.

जिल्हा न्यायाधीश श्री. ग्वालानी यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला. दरम्यान, आरोपींकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, शुक्रवारी त्यावरील सुनावणी होऊ न शकल्याने दोघांनाही सध्या कारागृहातच राहावे लागणार आहे. सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी न्यायालयात तपासाची प्रगती आणि उपलब्ध पुरावे सादर केले. तर आरोपींच्या वतीने ॲड. मिलिंद तोतरे यांनी बाजू मांडली.

भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (एसीबी) वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र देण्यासाठी कथितरित्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी डॉ. जायसवाल आणि त्यांच्या स्टेनोला अटक केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचून दोघांना रंगेहात पकडत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

पोलीस कोठडीदरम्यान एसीबीने आरोपींच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या बँक खात्यांची, बँक लॉकरची, चल-अचल मालमत्तेची तसेच विविध गुंतवणुकांशी संबंधित कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे. कथित भ्रष्टाचारातून मिळालेल्या रकमेची गुंतवणूक नेमकी कुठे करण्यात आली, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT