Kalyan Marriage Fraud : लग्नाचे आमिष दाखवून दोन महिलांनी घातला व्यावसायिकाला ५५ लाखांना गंडा

आयुष्यभराची कमाई गमावल्याने व्यावसायिक खचला
AI Image
AI Image
Published on
Updated on

डोंबिवली : लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. मात्र, कल्याणमध्ये एक भलतेच प्रकरण समोर आले असून, दोन महिलांनी लग्नाचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला तब्बल ५५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच फिर्यादीने महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या फसवणुकीची पद्धत पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

ओळखीचा गैरफायदा आणि विश्वासाचा संभ्रम

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोमा रमेश परदेशी (रा. वांद्रे, मुंबई) आणि जयश्री पाटील (रा. गौरीपाडा, कल्याण) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. कल्याणमधील एका नामांकित दुकानाच्या मालकाची १३ वर्षांपूर्वी जयश्री पाटील हिच्याशी ग्राहक म्हणून ओळख झाली होती. पुढे सहा वर्षांपूर्वी जयश्रीने त्याची ओळख रोमा परदेशी हिच्याशी करून दिली. रोमा एका मोठ्या विमा कंपनीत नोकरीला असल्याचे सांगून तिने विमा पॉलिसीच्या निमित्ताने व्यावसायिकाशी जवळीक साधली आणि त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, विमा पॉलिसीच्या नावाखाली रोमाने लाखो रुपये उकळले, परंतु कोणतीही पॉलिसी काढली नाही. काही काळाने जयश्रीच्या मध्यस्थीने रोमाने व्यावसायिकाशी लग्नाची तयारी दर्शविली. लग्नाचे आमिष दाखवून दोघींनी वेळोवेळी विविध कारणे सांगून व्यावसायिकाकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली.

पैसे उकळून लग्नाला नकार

२०२० ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत रोमा आणि जयश्री यांनी संगनमत करून व्यावसायिकाकडून टप्प्याटप्प्याने ५५ लाख रुपये उकळले. रोमाच्या भांडूप शाखेतील बँक खात्यात १४ लाख २१ हजार ६० रुपये, युनियन बँक खात्यात ४ लाख ३१ हजार ४४३ रुपये आणि ॲक्सिस बँक खात्यात १८ लाख ५२ हजार ५०३ रुपये वर्ग करण्यात आले. याव्यतिरिक्त रोख स्वरूपातही मोठी रक्कम घेण्यात आली. १८ एप्रिल २०२४ रोजी विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी करण्याचे निश्चित झाले होते, परंतु रोमा तिथे फिरकलीच नाही. २५ एप्रिल २०२४ रोजी तिने फिर्यादीला कार्यालयात बोलावून, "मला लग्न करायचे नाही, तुला जे करायचे ते कर," असे सुनावत स्पष्ट नकार दिला. या प्रकारानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री फिर्यादीला पटली.

आयुष्यभराची कमाई गमावल्याने व्यावसायिक खचला

फिर्यादी (वय ४५) याने लग्न होईल या आशेपोटी दुसरे लग्न केले नव्हते. मात्र, आयुष्यभराची कमाई गमावल्याने तो आता मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रोमा परदेशी हिला सुरुवातीला अटक केली होती, तिला नंतर जामीन मिळाला. तपासादरम्यान जयश्री पाटील हिला कोल्हापुरातून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून रक्कम वसूल करून न्याय द्यावा, अशी मागणी फिर्यादीने केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत हुंबे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news