Traffic Police Beaten Nagpur AI Photo
नागपूर

Nagpur Crime | मानकापूरमध्ये रोडरेजचा थरार; वाहतूक पोलिसाला टोळक्यांकडून बेदम मारहाण; कारची तोडफोड

जीवे मारण्याची धमकी, काही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर

पुढारी वृत्तसेवा

Traffic Police Beaten Nagpur

नागपूर : नागपुरातील मानकापूर परिसरात रोडरेजची धक्कादायक घटना समोर आली असून रात्री घरी परतणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचा ७ ते ८ दुचाकीस्वारांनी पाठलाग करून बेदम मारहाण केली. आरोपींनी कारची दगडाने तोडफोड करत जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि वाहन क्रमांकाच्या आधारे सर्व आरोपींची ओळख पटवली असून काही आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे.

नागपूर एमआयडीसी वाहतूक शाखेत कार्यरत असलेले कुणाल मधुसूदन सिंह (वय ३५) हे २८ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास जरीपटका येथून आपल्या महिला मैत्रिणीसोबत कारने मानकापूर येथील घरी परतत होते. दरम्यान मार्टिन नगर पुलाच्या चढावर ७ ते ८ दुचाकीस्वार भरधाव वेगाने आणि झिगझॅग पद्धतीने वाहन चालवत त्यांच्या कारसमोर येत होते.

यामुळे कुणाल सिंह यांनी हॉर्न वाजवल्यानंतर दुचाकीस्वारांनी सुरुवातीला बाजू दिली आणि कार पुढे निघाली. मात्र मानकापूर चौकाजवळ पोहोचताच दुचाकीस्वारांनी कारला मागून धडक दिली. त्यानंतर एका बुलेटस्वाराने कारचा रस्ता अडवला आणि काही क्षणांतच इतर साथीदारही घटनास्थळी जमा झाले.

आरोपींनी कार न थांबवल्याचा राग व्यक्त करत अश्लील शिवीगाळ सुरू केली. एका आरोपीने दगडाने कारच्या बोनटवर प्रहार केला, तर दुसऱ्याने मागील काच फोडून वाहनाचे नुकसान केले. कुणाल सिंह कारमधून खाली उतरताच आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका आरोपीने दगडाने त्यांच्या मान आणि पाठीवर वार केल्याने ते जखमी झाले.

घटनास्थळी स्थानिक नागरिक जमा होताच आरोपी पसार झाले. मात्र काही नागरिकांनी एका दुचाकीचा नोंदणी क्रमांक टिपून ठेवला होता. या धाग्यावरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींची ओळख पटवली.

मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कालसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील काही आरोपी अल्पवयीन आहेत. सर्व आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत बेकायदेशीर जमाव, दंगल, जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ, मालमत्तेचे नुकसान आणि मारहाण यांसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT