

Woman Attacked Nagpur
नागपूर : नागपूरच्या सक्करदरा परिसरात प्रेमसंबंधाच्या केवळ संशयातून शेजाऱ्यांनी एका महिलेवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर जखमी झालेल्या आईला वाचवण्यासाठी धावलेल्या २० वर्षीय मुलीलाही आरोपींनी बेदम मारहाण केली. तसेच घरात घुसून तोडफोड करत संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
सक्करदरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती खासगी कंपनीत कार्यरत असून संबंधित महिला घरी झुंबा क्लास चालवते. शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या मनात तिच्या पतीचे आणि पीडित महिलेचे कथित प्रेमसंबंध असल्याचा संशय निर्माण झाला होता. या संशयातून दोन्ही कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता.
२७ जून रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास आरोपींनी पीडित महिलेशी शिवीगाळ करत तिच्यावर हल्ला केला. त्याचवेळी एका आरोपीने लोखंडी गज उचलून महिलेच्या खांद्यावर जोरदार प्रहार केल्याने ती गंभीर जखमी झाली.
आईच्या आरडाओरड्यानंतर मदतीसाठी धावून आलेल्या २० वर्षीय मुलीलाही आरोपींनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तिच्या पोटात लाथा मारण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यानंतर आरोपींनी घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून तोडफोड केली. तसेच संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेनंतर पीडित महिलेने डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. उपचारानंतर सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे.