नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वात मोठ्या मार्केटमध्ये गुरुवारी झालेल्या वादळी पावसाचा मोठा तडाखा बसला. या ठिकाणी उघड्यावर ठेवलेली लाल मिरचीची 20 हजार पोती ओली झाली. अनेक अडत्यांकडील डाळ, धान्य पोती ओली होऊन मोठे नुकसान झाले.
दर सोमवारी कळमना बाजारात मोठ्या प्रमाणावर मिरचीची आवक होत असते. कुही, भिवापूर, उमरेड, मांढळ, अंभोरा चंद्रपूर, सिंदेवाही, अकोला, वाशिम, आंध्र प्रदेश, तेलंगणा येथील मिरचीची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. आता कडक उन्हाचे दिवस असल्याने हजारो पोती माल उघड्यावरच वाळवण्यासाठी ठेवलेला होता. मात्र. गुरुवारी आलेल्या अचानक पावसाने ही मिरची ओली झाली.
आता ही मिरची पुन्हा वाळवावी लागणार असून किंमतही कमी लागणार असल्याची माहिती अडत्यांनी दिली. वादळी पावसात रामा आखरे या शेतमजुराचा शेतात काम करीत असताना वीज पडून मृत्यू झाला. तर ८ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यासोबतच नागपूर जिल्ह्यात भाजीपाला, फळे उत्पादकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा