नागपूर
“परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्... राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी...” या भक्तिमय गजरात आणि “विठ्ठल-विठ्ठल” म्हणत तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन, टाळ-चिपळ्या हातात धरून आलेल्या वारकऱ्यांनी बुधवारी सकाळी नागपूरच्या क्रीडा चौक परिसरात पंढरपूरचा माहोल निर्माण केला.
खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित ‘जागर भक्तीचा’ या कार्यक्रमात ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात हरिपाठ पठणाचा सोहळा पार पडला. विठ्ठलभक्तांच्या उत्साह, आनंद आणि निष्ठेने संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला.
विठ्ठल–रखुमाईच्या वेशातील कलाकारांनी आगमनात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वारकरी बंधु-भगिनींसह अनेक भक्तांनी टाळ-चिपळ्यांच्या तालावर ठेका धरला. कुणी फुगड्या खेळत होते, कुणी गोल रिंगण करून ‘ज्ञानदेव तुकाराम’च्या गजरात पावले टाकत होते. भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले वातावरण पाहून उपस्थित सर्वांनाच विठ्ठलभक्तीचा स्पर्श झाला.
विशेष म्हणजे संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी यांनीदेखील फुगड्या खेळत भक्तीत सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी ह.भ.प. अनिल महाराज अहेर, ह.भ.प. केतन दरणे, मयूर महाराज दरणे, अरुण महाराज सातफळे, भिषिकर महाराज, कबीर मठाचे मुनींद्रनाथ महाराज, तसेच खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. दीपक खिरवडकर, अविनाश घुशे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमातील सर्व मान्यवरांचे स्वागत विश्वनाथ कुंभलकर, प्रदीप अवचट, दाउदखानी, आणि सोमु देशपांडे यांनी केले. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या या हरिपाठाने नागपूरमध्ये विठ्ठलभक्तीचा जागर झाला.