Nagpur IIIT student death
नागपूर : येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' मधील दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या नवव्या मजल्यावरून उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस चंद्रकांत माने (रा. कोल्हापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास श्रेयसने वसतिगृहाच्या नवव्या माजल्यावरून उडी घेतली. सुरक्षारक्षक आणि इतर विद्यार्थ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
श्रेयसची सेमिस्टर परीक्षा लवकरच सुरू होणार होती. या परीक्षेचा पुरेसा अभ्यास झाला नसल्याने तो गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बुट्टीबोरी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
श्रेयसचा मोबाईल सध्या लॉक आहे. "मोबाईल अनलॉक झाल्यानंतर त्याच्या शेवटच्या संवादावरून किंवा काही चिठ्ठी असल्यास आत्महत्येचे नेमके आणि खरे कारण समोर येऊ शकेल," असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, या घटनेनंतर ट्रिपल आयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी रात्रभर कॅम्पसमध्ये आंदोलन केले.