Nagpur Kalmana Housebreak
नागपूर : लग्नसमारंभासाठी घराला कुलूप लावून गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला मारणाऱ्या दोन चोरट्यांना कळमना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक करत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे १ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कळमना पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा वेगाने तपास करत दोन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी राजू केशवराव बूटके (वय ५७, रा. गजमुख सोसायटी, ओमसाई नगर, कळमना) यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी २३ जून २०२६ रोजी सकाळी घराला कुलूप लावून कुटुंबासह गुमगाव येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी परतल्यानंतर मुख्य दरवाज्याची कडी तुटलेली दिसून आली. घरातील लोखंडी कपाट फोडून सोन्या-चांदीचे दागिने, फुजी कंपनीचा कॅमेरा, एचपी कंपनीचा लॅपटॉप आणि १५ हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरातील १० ते १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान सुमीत गणपत मेश्राम (वय १९, रा. नारागाव, जरीपटका) आणि ध्रुव राजेश बिरबल (वय २०, सध्या टिमकी तिनखंबा चौक परिसर) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून सोन्याचे पदक, सोन्याचे कानातील दागिने आणि एचपी कंपनीचा लॅपटॉप असा एकूण १ लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण) वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय जाधव तसेच कळमना पोलिसांच्या तपास पथकाने या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
कळमना पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी तपासामुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून चोरीचा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.