नागपूर :पुढारी वृत्तसेवा
Nagpur Hospital Vandalized: जाफरनगरातील आवस्थी चौकाजवळील खासगी रुग्णालयात हृदयरुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर बुधवारी सायंकाळी तणाव निर्माण झाला. मृताच्या नातेवाइकांसह स्थानिक नागरिकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केल्याचा आरोप असून, उपचार करणाऱ्या डॉक्टरला जाब विचारण्यासाठी जमावाने त्याच्याशी हुज्जत घातल्याने परिस्थिती चिघळली. माहिती मिळताच मानकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डॉक्टरला पोलिस संरक्षणात बाहेर काढले.
जाफरनगरातील ३८ वर्षीय मोहसीन खान यांना रविवारी छातीत दुखत असल्याने आवस्थी चौक परिसरातील ए-स्क्वेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला.
मोहसीन यांच्या कुटुंबीयांनी उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप केला आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर योग्य उपचार सुरू करण्यास विलंब झाला तसेच अनेक तास डॉक्टरांनी रुग्णाकडे लक्ष दिले नाही, असा दावा नातेवाइकांनी केला.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मोहसीन यांना सकाळी सुमारे ११ वाजता आपत्कालीन विभागात आणण्यात आले होते. मात्र, हृदयरोगतज्ज्ञ दुपारनंतर दाखल झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच रुग्णाचा ईसीजी वेळेत तपासण्यात आला नाही, असा प्रश्नही नातेवाइकांनी उपस्थित केला. मात्र, उपचारातील हलगर्जीपणाचे हे आरोप अद्याप स्वतंत्र तपासणीत सिद्ध झालेले नाहीत.
मोहसीन यांच्या अंत्यसंस्कारानंतर बुधवारी नातेवाईक उपचाराबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी पुन्हा रुग्णालयात आले. त्यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक आणि स्थानिक नागरिक रुग्णालयाबाहेर जमा झाले.
जमावाने रुग्णालयाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी रुग्णालयाच्या परिसरातील मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप रुग्णालय व्यवस्थापनाने केला आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरला मारहाण करण्याचाही प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची माहिती मिळताच मानकापूर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संबंधित डॉक्टरला पोलिस संरक्षणात रुग्णालयाबाहेर काढले.
रुग्णालय प्रशासनाने उपचारात कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा झाल्याचा आरोप फेटाळला आहे. रुग्णाची प्रकृती दाखल होताच गंभीर होती. हृदयातील डाव्या बाजूची मुख्य रक्तवाहिनी पूर्णपणे ब्लॉक झाली होती, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. इरशाद पठाण यांनी दिली.
डॉ. शादमान अली यांनी रुग्णावर उपचार आणि व्यवस्थापन केले. मात्र, सर्व प्रयत्न करूनही रुग्णाला वाचवता आले नाही, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. घटनेच्या वेळी आपण शहराबाहेर असल्याचे डॉ. पठाण यांनी स्पष्ट केले.
तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी डॉक्टर आणि रुग्णाच्या काही नातेवाइकांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांचे जबाब नोंदविले. रुग्णालयाच्या मालमत्तेची तोडफोड आणि गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाईचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.