

नागपूर : दरोडा टाकण्याच्या तयारीत घातक शस्त्रांसह दबा धरून बसलेल्या टोळीचा अजनी पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी वेळीच कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्यासोबत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून तलवार, लोखंडी सळई, स्टीलचा चाकू, मिरची पावडर, नायलॉनची दोरी आणि लाकडी दांडा असा सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अजनी पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी ओंकारनगर चौकातून बेलतरोडी सिमेंट रोडच्या दिशेने गस्तीवर होते. यावेळी पेट्रोल पंपाजवळ काही युवक घातक शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये आरोपींकडून तलवार, लोखंडी सळई, स्टीलचा चाकू, मिरची पावडर, नायलॉनची दोरी आणि लाकडी दांडा आढळून आला. ही सर्व साधने दरोड्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचा पोलिसांचा संशय असून, या कारवाईत सुमारे १.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सूर्या हातागडे, शेखर हातागडे, महेंद्र माणकर आणि शिवा पारसे अशी आहेत. त्यांच्यासोबत असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सूर्या हातागडे याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही टोळी नेमका कोणता दरोडा टाकण्याच्या तयारीत होती, तसेच या कटामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करीत आहेत.