Hingna constituency voter list
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदारसंघात (क्र. 50) स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ आणि बोगस नावे समोर आल्याने पुन्हा एकदा बोगस मतदारांच्या नोंदणीचा मुद्दा पुढे आला आहे.
राजीव नगरात घर क्र. 1 येथे तब्बल 200 पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी आढळली आहे. बोगस नावे आणि संशयास्पद नोंदींनी या यादीत प्रचंड प्रमाणात संशयास्पद नोंदी आढळून आल्या असून, लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते, माजी जीप सदस्य दिनेश बंग यांनी म्हटले आहे. या मतदारसंघात भाजपचे आमदार समीर मेघे यांनी माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचा पराभव केला होता. निवडणुकीच्या काळातही आपल्याच महाविद्यालयीन, निवासी विद्यार्थ्यांचा मेघे यांनी गैरवापर केल्याचा, मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप केला गेला.
वानाडोंगरी शहरातील राजीव नगर प्रभाग क्रमांक 5 मध्ये घर क्रमांक 1 वर तब्बल 200 पेक्षा जास्त मतदार राहत असल्याचे दाखविण्यात आले आहे. ही बाब अत्यंत विसंगत आणि अवास्तव असून, निवडणूक प्रक्रियेतील गंभीर दुर्लक्ष दर्शविते. विशेष म्हणजे, या प्रभागातील स्लम वसाहतीत विदर्भातील नामवंत आणि सत्ताधारी वर्गाशी संबंधित मेघे कुटुंबातील तब्बल 27 सदस्यांची नावे मतदार यादीत असल्याचेही समोर आले आहे.
फक्त राजीव नगरच नव्हे, तर हिंगणा विधानसभा क्षेत्रातील नगरपरिषद बुटीबोरी, वाडी, वानाडोंगरी, डिगडोह (देवी), नीलडोह, हिंगणा, गोधनी रेल्वे तसेच सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये हजारो बोगस मतदारांची नावे समाविष्ट झाल्याचे प्रारूप यादीतून दिसून येत आहे.यासोबतच नागपूर शहर आणि जिल्ह्याबाहेरील भागांमधून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची नावे त्यांच्या होस्टेल पत्त्यावरून मतदार म्हणून नोंदविण्यात आली आहेत. यामुळे मतदार यादीचा वापर सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या प्रकारामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निष्पक्षपणे पार पाडल्या जाण्याबाबत नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली आहे. “बोगस मतदारांच्या आधारावर निवडणुका लढवल्या गेल्यास सामान्य माणसाला लढण्याची हिंमत राहणार नाही, आणि लोकशाहीची हत्या होईल,असे मत सामाजिक वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
खरंतर देशातील व राज्यातील सरकार हे बोगस मतांवरच निवडून आले आहे. सरकारकडून तर काही अपेक्षा नाहीत परंतु विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राज्य निवडणूक आयोगावर जो कलंक लागला तो कलंक पुसायचा असेल तर राज्य निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून घरोघरी तपासणी मोहीम राबवण्याची आणि बोगस मतदारांची नावे वगळण्याची कारवाई करावी. अन्यथा या निवडणुकांमध्ये “लोकशाहीचा सर्रास खून होईल,” अशी तीव्र प्रतिक्रिया जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते दिनेश बंग यांनी दिली. दरम्यान,जिल्हा प्रशासनाने असा प्रकार होऊ शकत नाही झाला असल्यास त्यांची सविस्तर यादी द्यावी. प्रशासनामार्फत योग्य कारवाई केली जाईल. ती नावे कमी केली जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे.