लक्ष्मीनगर चौकापर्यंत निघालेल्या या शोभायात्रेत विविध सांस्कृतिक व धार्मिक देखावे सादर करण्यात आले.  Pudhari
नागपूर

Nagpur Gudi Padwa | गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मीनगरात भव्य शोभायात्रा व सामूहिक रामरक्षा पठण; सई ताम्हणकर यांची उपस्थिती

भारताची गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सातत्याने उंचावत आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Gudi Padwa Shobha Yatra

नागपूर: भारताची गुढी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सातत्याने उंचावत आहे. ही गुढी अशीच उंचच उंच जावी आणि देशाला प्रगतीची प्रेरणा देत राहो, अशा शुभेच्छा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केल्या. गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या निमित्ताने लक्ष्मीनगर येथे नववर्ष अभिनंदन समारंभ समितीच्या वतीने आयोजित भव्य शोभायात्रा व सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.

सकाळी तात्या टोपे नगर येथील गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या शोभायात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लक्ष्मीनगर चौकापर्यंत निघालेल्या या शोभायात्रेत विविध सांस्कृतिक व धार्मिक देखावे सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. आमदार तथा श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

ढोलपथक, दोरीवरील मलखांब व घोडदौड सादर करणाऱ्या बालकांचे कौतुक करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुढीपाडवा हा प्रत्येक हिंदू व मराठी माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून तो नव्या संकल्प, नव्या आशा आणि मंगलमय सुरुवातीचे प्रतीक आहे. पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणाऱ्या नागरिकांमुळे शोभायात्रेला अधिकच तेज प्राप्त होते.

प्रास्ताविकात संदीप जोशी यांनी गुढीपाडवा हा नववर्षाचा पारंपरिक प्रारंभ असल्याचे सांगत सर्वांना शुभेच्छा दिल्या. दरवर्षी प्रेमापोटी या शोभायात्रेत सहभागी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले.

गुढीपाडवा व हिंदू नववर्ष साजरे करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. संपूर्ण परिसरात उत्साह, भक्ती आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.

नववर्ष अभिनंदन समारोह समितीचे गजानन निशीतकर, मनोज देशपांडे, प्रफुल्‍ल माटेगांवकर, जयंत आदमने, शंतनु येरपुडे, कौस्तुभ खांडेकर, दर्शन पांडे, मनीष जैन, आशिष पुसदकर, नीरज दोंतुलवार, अमोल वटक, अजय डागा, दीपक वानखेडे, सौ काजल बागडी, अनुसया गुप्ता, आनंद टोळ, प्रकाश रथकंठीवार, प्रणव घुगरे आदींचे आयोजनाच्‍या यशस्‍वीतेसाठी सहकार्य लाभले.

सामूहिक रामरक्षा पठणाने वातावरण भक्तिमय

शोभायात्रेनंतर लक्ष्मीनगर चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुढीपूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर भाग्यश्री बारस्कर व त्यांच्या चमूच्या नेतृत्वाखाली सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण झाले. या पठणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संदीप जोशी यांनीही सहभाग घेतला. रामनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

सई ताम्हणकर ठरल्या आकर्षण

अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनी सर्वांना गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा देत हे वर्ष सर्वांसाठी सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जावो, अशी मनोकामना व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचे गुढी देऊन स्वागत करण्यात आले.

प्रमुख क्षणचित्रे

• भगव्या पताका आणि रांगोळ्यांनी सजला संपूर्ण परिसर

• संघ शताब्दी निमित्त ‘संघ शक्‍ती युगे युगे...’ चा विशेष रथ

• महाबली हनुमान अवताराचे सादरीकरण

• हिरकणी ढोल-ताशा व लेझीम पथकांचे दमदार प्रदर्शन

• दोरीवरील मलखांब व घोडदौड सादर करणाऱ्या बालकांचे कौतुक

• वारकरी भजन व वेद पठण

• घोड्यांवर श्रीराम, लक्ष्मण, सीता माता व छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन

• अरविंद उपाध्ये यांचे मनमोहक बासरी वादन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT