Marathwada Graduates Constituency Election 2026 pudhari photo
नागपूर

Nagpur Graduates Constituency Election | महायुतीत उमेदवार ठरेना; काँग्रेसची उमेदवारी जाहीर करत प्रचारात आघाडी

भाजपसाठी उमेदवार निवडीची सोपी वाटणारी परीक्षा यंदा कठीण

पुढारी वृत्तसेवा

Marathwada Graduates Constituency Election 2026

राजेंद्र उट्टलवार

नागपूर : मुलांसोबतच आता शिक्षकांनाही कठीण परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. कधीकाळी भाजपचा गड असलेला नागपूर पदवीधर मतदारसंघ काँग्रेसने ताब्यात घेतला. वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक प्रमुख केलेले माजी आमदार सुधाकर कोहळे मागे हटण्यास तयार नाहीत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्याला पुन्हा एक चान्स देतीलच या आशेवर माजी शिक्षक आमदार प्रा. अनिल सोले आहेत.

आता भाजपसाठी उमेदवार निवडीची सोपी वाटणारी परीक्षा यंदा कठीण झाली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजित वंजारी यांना कायम ठेवत विश्वास टाकला आहे. दुसरीकडे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्याचा फंडा यावेळी पदवीधर निवडणुकीतही भाजपकडून वापरला जाण्याची चिन्हे आहेत.

पदवीधर मतदारसंघ नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रचारासाठी क्षेत्रफळ मोठे असल्याने उमेदवाराच्या नावाची घोषणा लवकर करण्याची प्रथा आहे.

नितीन गडकरी या मतदारसंघातून लढत असताना ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीपासून नियोजन करीत. मात्र, ते खासदार झाल्यानंतर पदवीधरचे उमेदवार ऐनवेळी ठरू लागले आहेत. अॅड. अभिजित वंजारी ५ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरिवेल्ला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

प्रदेश प्रभारी म्हणून सिरिवेल्ला प्रसाद यांचा हा पहिलाच नागपूर दौरा आहे. ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. ७ ऑक्टोबरला छाननी होईल, तर ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

अमरावतीमध्येही महायुतीत विद्यमान भाजप आमदार,शिवसेनेसाठी ही जागा सुटल्याने ते आणि प्रहार असे तीन प्रबळ तर इतर अपक्ष दावेदार आहेत. सर्वांची शक्तिप्रदर्शन सुरू आहे. एकंदरीत नागपूर,पुणे आणि अमरावती अशा तीन आमदारांच्या जागांसाठी किमान 30 उमेदवार सध्यातरी रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसची आघाडी, तीन उमेदवार जाहीर

नागपूर विभाग पदवीधर : ॲड.अभिजीत गोविंदराव वंजारी

पुणे विभाग शिक्षक: जयंत दिनकर आसगावकर

अमरावती विभाग शिक्षकः प्रा. अदिती ऋषीकेश पोहरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT